नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक निकोलस बर्न्स यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. देशातील सर्व संस्थांवर भाजपाने कब्जा केला आहे. जर लोकशाहीच्या तत्त्वांवर अमेरिकेचा विश्वास असेल तर मग ते गप्प का आहेत?, असा सवाल राहुल गांधींनी बर्न्स यांना केला. बर्न्सशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणापासून ते देशांतर्गत राजकारण, चीन-भारत तणाव आणि शेतकरी आंदोलनासंदर्भातील सर्व गोष्टींविषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच पंतप्रधान झाल्यास काय कराल, या प्रश्नांवरही राहुल यांनी उत्तर दिले.
पंतप्रधान झाल्यास तुमचे प्राधान्य काय असेल, असा सवाल निकोलस बर्न्स यांनी राहुल गांधींना केला. तेव्हा राहुल म्हणाले, की रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करेल. अर्थव्यवस्था सुरू करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्पादन वाढविणे आणि लोकांच्या हाती पैसा देणे आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधींचे पाकिस्तानवर भाष्य
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी सध्या होत असलेल्या प्रयत्नाचा परिणाम होईल का, असा प्रश्न निकोलस यांनी केला. भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. पण मला वाटत नाही की, ते सहज आहे. भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा एका बिंदूच्या पलीकडे जाणे अवघड आहे.
भारतातील घटनांवर अमेरिकेचे मौन का ?
निकोलस बर्न्स यांच्याशी बोलताना राहुल गांधींनी आसाममध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या गाडीत सापडलेल्या ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेबद्दल राष्ट्रीय माध्यमांमध्ये बातमी नाही. या घटनांवर अमेरिकन सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिका जर भारताचा लोकशाही भागीदार आहे. तर मग या घटनांवर ते बोलत का नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपाने घटनात्मक संस्थावर ताबा मिळवलाय
राहुल यांनी भाजपाने देशातील महत्त्वाच्या घटनात्मक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप केला. भाजपा आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. त्यांना माध्यमांकडूनही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे केवळ काँग्रेसच नाही. बसपा, सपा, राष्ट्रवादीसारखे पक्ष निवडणूक जिंकत नाहीत. निवडणूक लढविण्यासाठी संस्थात्मक चौकट आवश्यक आहे. या संस्था निष्पक्ष लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. परंतु भाजपाने त्यांच्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. यामुळे विरोधी पक्षांचे नुकसान होत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर भाष्य
नवीन कृषी कायद्यांवर राहुल गांधी यांनी भाष्य केले. कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्यकता आहे. परंतु त्या सुधारणा शेतकऱ्यांशी चर्चा करून करता येतील. आपण कृषी क्षेत्राच्या पायावर आक्रमण करू शकत नाही. काँग्रेसचे सरकार असताना सातत्याने जनतेकडून अभिप्राय घेण्यात आला. मात्र, ते आता बंद झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
भारतीय भागावर चीनचा कब्जा
चीन भारताच्या भूमीवर कब्जा करत आहे. त्यांचे सैनिक भारतीय प्रदेशात आहेत. परंतु माध्यमांमध्ये या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. भारत अंतर्गत रूपात कमकुवत आणि विभागलेला असल्याने चीनला हे शक्य झाले. चीनला सामोरे जाण्यासाठी भारताला सामर्थ्यवान आणि संघटित होण्याची गरज आहे. ही काळाची गरज आहे. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि भारत या दोघांनीही आर्थिक रणनीती आखण्याची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा - नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल