कोलकाता : "केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करेलच. याला कोणीही रोखू शकत नाही", असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२९ नोव्हेंबर) केलं. ते कोलकातामध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.
सीएए निश्चितपणे लागू केलं जाईल : अमित शाह म्हणाले की, "ममता बॅनर्जी याला विरोध करत आहेत. मात्र मी तुम्हाला खात्री देतो की सीएए हा देशाचा कायदा आहे. मी या मंचावरून घोषणा करत आहे की, सीएए निश्चितपणे लागू केला जाईल. भाजपा त्याची अंमलबजावणी करेल. आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही". मात्र, शाह यांनी सीएए कधी लागू करण्यात येईल याची निश्चित वेळ सांगितली नाही.
पश्चिम बंगालमध्येही सरकार बनवू : अमित शाह यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला निवडून देण्याचं आवाहन केलं. अमित शाह यांनी दावा केला आहे की, भाजपा २०२६ मध्ये राज्यात दोन तृतीयांश बहुमतानं सत्तेवर येईल. "आम्ही २०२४ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवू आणि नंतर पश्चिम बंगालमध्येही सरकार बनवू", असं ते म्हणाले. "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपाची कामगिरी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा पाया तयार करेल", असं ते म्हणाले. विशेष म्हणजे, भाजपानं २०१९ मध्ये राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
बंगाल बॉम्बचे आवाज ऐकतोय : यावेळी बोलताना अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून जोरदार हल्ला चढवला. "इथे भ्रष्टाचार थांबला आहे का? मोदीजी बंगालमध्ये करोडोंचा निधी पाठवतात, मात्र टीएमसी (तृणमूल कॉंग्रेस) सर्व पैसे घेते. टीएमसीनं बंगालचा नाश केला आहे. बंगालमध्ये सर्वाधिक राजकीय हिंसाचार आहे. घुसखोरी हा मुख्य मुद्दा आहे. ममताजी हे थांबवू शकत नाहीत. जो बंगाल एकेकाळी रवींद्र संगीत ऐकायचा, तो आता बॉम्बचे आवाज ऐकतोय. मी गुजरातचा आहे, पण मी माझ्या राज्यात कोणत्याही नेत्याकडे नोटांचं बंडल पाहिलं नाही", असं बंगालमधील काही प्रकरणांचा उल्लेख न करता ते म्हणाले.
हेही वाचा :