पणजी - कोरोनाबाबत आम्ही सतर्क आहोत पण कोणतेही निर्बंध लादले जाणार नाहीत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गोव्यात 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जीनोम सिक्वेन्सिंगसाठी चाचणी केली जाते. 27 डिसेंबरच्या मॉक ड्रीलपूर्वी तयार राहण्यासाठी आम्ही बैठकीत अधिकाऱ्यांनाही सतर्क केले आहे. असेही मुख्यमंत्री सावंत यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
गोव्यात दरवर्षी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावेळी कोरोनाने पुन्हा तोंड वर काढल्याने ख्रिसमसवर गदा येते काय अशी शंका पर्यटकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. मात्र गोव्यात कोणतेही कोरोना निर्बंध असणार नाहीत असे मुख्यमंत्री प्रमोद सावत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडणार नाही असे आजतरी स्पष्ट झाले आहे.
कोराना काळात गोव्यातील पर्यटनावर दोन वर्षे मोठा विपरित परिणाम झाला होता. गोव्यात दरवर्षीपेक्षा या दोन वर्षात पर्यटकांची संख्या खूपच रोडावली होती. त्यामध्ये आता कुठे सुधारणा होत असताना पुन्हा कोरोना चीनमध्ये तसेच अमेरिकेसह इतर काही देशात वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा ख्रिसमसवर परिणाम होतो की काय अशी परिस्थिती होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने यंदा गोव्यात ख्रिसमस जोरदार साजरा होणार असे दिसत आहे.