नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्यात अडकलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 10 मार्चपर्यंत जामीन मिळणार नाही. 27 फेब्रुवारीपासून सीबीआय कोठडीत असलेल्या सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने रिमांड वाढवण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने सीबीआयच्या रिमांडवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत; रिमांड वाढवण्याचा कोणताही आधार नसल्याचे सांगितले.
पत्नीच्या आजारपणाचे कारण देत मागितला जामीन : सिसोदिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी बाजू मांडली. आणखी एक वकील मोहित माथूर यांनी सिसोदिया यांच्या पत्नीच्या आजारपणाचे कारण देत जामीन मागितला. परंतु न्यायालयाने सांगितले की, जामिनावर 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. अबकारी घोटाळ्यात अडकलेल्या मनीष सिसोदिया यांना शनिवारीही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयीन कामकाजादरम्यान सीबीआयने म्हटले की, सिसोदिया तपासात सहकार्य करत नाहीत. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अधिक माहिती मिळवायची आहे, त्यामुळे रिमांड देण्यात यावा.
मनीष सिसोदियाच्या प्रकरणात आतापर्यंत काय घडले त्यावर एक नजर टाकुया -
- 17 ऑगस्ट 2022 - सीबीआयने अबकारी घोटाळ्यात एफआयआर नोंदवला, मनीष सिसोदिया यांना आरोपी करण्यात आले.
- 19 ऑगस्ट 2022 - मनीष सिसोदिया यांच्या अधिकृत निवासस्थानावर सीबीआयचा छापा.
- 17 ऑक्टोबर 2022- सीबीआयने मनीष सिसोदिया यांची 9 तास चौकशी केली.
- 19 फेब्रुवारी 2023 - सीबीआयने मनीष सिसोदिया यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले पण सिसोदिया यांनी आणखी वेळ मागितला.
- 26 फेब्रुवारी 2023 - जेव्हा मनीष सिसोदिया CBI मुख्यालयात पोहोचले तेव्हा CBI ने त्यांना चौकशीत सहकार्य न केल्यामुळे अटक केली.
- 27 फेब्रुवारी 2023 - सिसोदिया यांना मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले जेथे सीबीआयला 5 दिवसांची कोठडी मिळाली.
- 4 मार्च 2023 - म्हणजेच रिमांडचा कालावधी संपल्यानंतर मनीष सिसोदिया पुन्हा राऊसॲव्हेन्यू कोर्टात हजर झाले.
५ दिवसांची कोठडी : मनीष सिसोदिया यांना विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांच्या न्यायालयात हजर केले होते. सीबीआयने त्यांची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये बराचवेळ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. सिसोदिया यांच्यावतीने तीन वकिलांनी बाजू मांडली होती.