नवी दिल्ली : देशात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपाय सुचवला आहे. ते म्हणाले की उत्पादन वाढवण्यासाठी आणखी काही कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील असाच पर्याय सुचवला होता.
गडकरी म्हणाले, की एकाच कंपनीला लस बनवण्याचे कंत्राट देण्याऐवजी, किमान दहा कंपन्यांना हे कंत्राट देण्यात यावे. तसेच, या लसीचे पेटंट ज्या कंपनीकडे आहे, त्या कंपनीला इतर कंपन्यांकडून १० टक्के रॉयल्टी देण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक राज्यात आधीपासूनच दोन ते तीन प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. कित्येक मोठ्या कंपन्यांकडे लस उत्पादन करण्याची क्षमताही आहे. त्यांना केवळ लसीच्या फॉर्म्युलाची गरज आहे. तो फॉर्म्युला या कंपन्यांना दिल्यास, १५ ते २० दिवसांमध्येच मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होतील. या लसी सुरुवातीला देशात वाटून, पुन्हा जर जास्त शिल्लक राहिल्या तर निर्यात करता येतील. त्यामुळे योग्य वाटल्यास यावर विचार केला जावा, असे गडकरी म्हणाले.
देशातील कोरोना परिस्थिती..
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ६७ हजार ३३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, एका दिवसातील सर्वाधिक ४,५२९ मृत्यूंची नोंद करण्यात आली. दरम्यान, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला.
- एकूण रुग्ण : २ कोटी, ५४ लाख, ९६ हजार ३३०.
- एकूण डिस्चार्ज : २ कोटी, १९ लाख, ८६ हजार, ३६३.
- एकूण मृत्यू : २ लाख, ८३ हजार २४८.
- सक्रिय रुग्ण : ३२ लाख, २६ हजार ७१९.
- एकूण लसीकरण : १८ कोटी, ५८ लाख, ९ हजार ३०२.