प्रयागराज Nithari Case : नोएडाच्या गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर यांची अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. या दोघांना यापूर्वी गाझियाबाद न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एसएएच रिझवी यांच्या खंडपीठानं निर्णय देताना दोघांची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण : हे प्रकरण २००६ मधील आहे. देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडाच्या सेक्टर ३१ जवळ निठारी नावाचं छोटेसं गाव आहे. या गावात डिसेंबर २००६ मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली होती. येथे एका झोपडीत १९ मुलांवर अमानुष अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली. हे सर्व एका दिवसात घडलं नव्हतं. हा भयानक प्रकार सुमारे दीड वर्ष सुरू होता!
मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकायचे : निठारी गावातील कोठी क्रमांक डी ५ मध्ये व्यापारी मोनिंदर सिंह पंढेर नोकर सुरेंद्र कोली याच्यासोबत राहत होता. पंढेर आणि कोली गावातील निष्पाप मुलांना कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं आपल्याकडे बोलवत असे. त्यानंतर ते क्रौर्याची परिसीमा ओलांडून त्यांची हत्या करायचे. मुलांची हत्या केल्यानंतर ते मृतदेहाचे तुकडे करायचे आणि त्या तुकड्यांना घरामागील नाल्यात फेकायचे.
कोठीजवळ भूत असल्याची चर्चा : दीड वर्षांहून अधिक काळ हे भयंकर कृत्य सुरूच होतं. सुरुवातीला याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. मात्र काही काळानंतर याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. या कोठीजवळील पाण्याच्या टाकी जवळून मुलं कशी गायब होतात, असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला. गावकऱ्यांना वाटलं की या पाण्याच्या टाकीजवळ भूताचं वास्तव्य आहे, जो लहान मुलं तिथे गेल्यावर त्यांना गिळतो.
प्रकरण कसं उघडकीस आलं : डिसेंबर २००६ मध्ये एका बेपत्ता मुलीच्या तपासादरम्यान या मुलीची हत्या सुरेंद्र कोळीनं केल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासात समोर आलं की, मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांनी या लहान मुलांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. ते मुलांना कोठीत नेऊन आधी त्यांचा विनयभंग करायचे. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करायचे. एवढेच नाही तर ते मृतदेहाचे छोटे तुकडे करून त्यांचं मांस खात असत. त्यानंतर मृतदेहाचे उरलेले अवशेष नाल्यात फेकून द्यायचे.
न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली : या प्रकरणी घरमालक मोनिंदर सिंह पंढेर आणि नोकर सुरेंद्र कोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी करण्यात आली. आरोपींवर मुलांची हत्या करून त्यांच्या शरीराचे अवयव परदेशात विकल्याचाही आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक न्यायालयानं दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निर्णयाविरोधात त्यांनी अलाहबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज न्यायालयानं या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
हेही वाचा :
- Man Killed Wife Daughter : थरारक! पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या, पती कॅमेऱ्यासमोर म्हणाला...
- Brother Sexually Assaults Minor Sister : सख्ख्या भावाचा अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; पीडिता गरोदर
- Delhi Crime News : यूट्यूबर झालेला स्वयंघोषीत बाबा करत होता महिलांवर बलात्कार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर