नवी दिल्ली Most Powerful Women List : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ३२वं स्थान पटकावलं. या प्रतिष्ठित यादीमध्ये राजकारण, व्यवसाय, मीडिया आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिलांचा समावेश असतो.
यादीतील इतर भारतीय महिला : सीतारामन यांचा यादीतील समावेश भारतीय राजकारण आणि धोरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकतो. या यादीतील इतर उल्लेखनीय भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा (६० वा क्रमांक), स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल (७० वा क्रमांक) आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ (७६ वा क्रमांक) यांचा समावेश आहे.
जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश : युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लगार्डे यांचा क्रमांक लागतो. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चौथा क्रमांक पटकावला. अमेरिकन पॉप स्टार टेलर स्विफ्ट या यादीत पाचव्या स्थानी आहे.
देशाच्या आर्थिक धोरणांना आकार दिला : निर्मला सीतारामन यांनी मे २०१९ मध्ये भारताच्या अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषत: कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं. निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्यांनी यूके स्थित कृषी अभियंता असोसिएशन आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये पदं भूषवली आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगावर काम केलंय.
हे वाचलं का :