पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी NEET UG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. यात तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी NEET परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील श्रीनिकेत रवी, तनिष्क भगत आणि रिद्धी वजारींगकर हे उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 50 मध्ये आले आहेत. श्रीनिकेत रवीने 7वा, तनिष्क भगतने 27वा आणि रिद्धी वजारींगकरने 44वा क्रमांक पटकावला आहे. श्रीनिकेत रवीने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
पात्र झाले इतके विद्यार्थी : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात राज्यातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास 50 हजारांनी वाढले आहेत.
इतक्या भाषांमध्ये झाली परीक्षा : यावर्षी नीट परीक्षेसाठीच्या नोंदणीसह पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी देशभरात 4 हजार 97 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचे 14 केंद्र देशाबाहेरही होते. ही परीक्षा मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये पार पडली होती. या परीक्षेसाठी 20 लाख 87 हजार 462 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या 20 लाख 38 हजार 596 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 45 हजार 976 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दरम्यान, श्रीनिकेत रवीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर राज्यातील आर्या पाटील, हादी सोलकर यांनी अपंग प्रवर्गातील, पलक शहाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून, आयुष रामटेकेने अनुसूचित जाती प्रवर्गातून, शिवम पाटील इतर मागास वर्ग प्रवर्गातील पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.