कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्यात होती.
जलपाईगुडीच्या जिल्हा दंडाधिकारी मोमिता गोद्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 'अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 50 जणांना वाचवण्यात यश आले आहे. जवळपासच्या लोकांनी सांगितले की, 30-40 लोक अजूनही बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यात गुंतले आहेत.
2 मिनिटात सर्व काही संपले दुर्गा मातेच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक सामान घेऊन आले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विसर्जनासाठी भाविक नदीच्या काठावर आले, मात्र पात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित व्हावे म्हणून थोडे पुढे झाले. लोक मध्यभागी उभे राहून मूर्तीचे विधीवत विसर्जन करत असताना अचानक नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि जोरदार प्रवाह आला. पाण्याचा प्रवाह जणू अचानक पूर आला होता. जोरदार प्रवाहामुळे लोक वाहू लागले. 2 मिनिटात सर्व काही बुडू लागले. पाण्याचा वेग एवढा होता की नदीत अडकलेल्या लोकांना मदत करता आली नाही.