नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार आहेत. या प्रकरणी राजधानी दिल्लीत निदर्शने करण्याची काँग्रेसची योजना होती. काँग्रेसने पक्ष कार्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत रॅली काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना परवानगी मिळालेली नाही. दरम्यान राहुल गांधी त्यांची बहिण प्रियंका गांधी यांच्यासह ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. ईडी कार्यालयात राहुल गांधी पोहोचले असताना तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. काँग्रेस कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.
राहुल ईडीच्या कार्यालयात - प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बघेल यांच्यासह पक्षाच्या नेत्यांच्या मोठ्या ताफ्यासह अकबर रोडवरील काँग्रेस कार्यालयातून सुरुवात केल्यानंतर राहुल गांधी सकाळी 11 च्या सुमारास मध्य दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचले. बॅरिकेडिंग पाहता, गांधींनी तपास एजन्सीच्या कार्यालयात जाण्यासाठी एक वळसा घेतला. राहुल ईडीसमोर हजर झाले. एखाद्या प्रकरणात चौकशीसाठी राहुल गांधी केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेस खासदार आणि कार्यकर्ते एआयसीसी मुख्यालयात जमले होते. सुरजेवाला यांनी जाहीर केले की ते ईडी कार्यालयाकडे शांततेने मोर्चा काढतील आणि जर त्यांना थांबवले तर ते अटक करवून घेतील.
गर्दीमुळे मोर्चाला परवानगी नाही - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी अकबर रोडवर बसण्याची परवानगी मागितली होती. मात्र मोठ्या गर्दीमुळे मोर्चाला परवानगी मिळू शकली नाही. तत्पूर्वी, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राहुल गांधींसोबत काँग्रेसचे सर्व खासदार, कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख नेतेही ईडी कार्यालयात जातील. सचिन पायलट म्हणाले होते की, गेल्या सात-आठ वर्षांत केंद्रीय संस्थांचा कसा गैरवापर झाला हे देशाने पाहिले आहे. ईडी ही केंद्र सरकारची सर्वात लाडकी एजन्सी आहे, असा टोला सचिन पायलट यांनी लगावला होता. त्याचवेळी, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या सोनिया गांधी यांना ईडीने समन्सची नवी तारीख दिली आहे. ईडीने 23 जून रोजी सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. यापूर्वी, ईडीने 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्या हजर होऊ शकल्या नाहीत.
नॅशनल हेराल्ड प्रकरण कधी प्रसिद्धीच्या झोतात आले? - नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या 2000 कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.
राहुल आणि सोनिया 2015 पासून जामिनावर - सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले होते. 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली.
हेही वाचा - National Herald Case : महाराष्ट्रातील ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस करणार निदर्शने