नवी दिल्ली Narendra Modi : दिल्लीतील द्वारका रामलीला समितीनं आयोजित केलेल्या रामलीलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळी देशातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, येत्या काही महिन्यांत अयोध्येतील भव्य राम मंदिरात भगवान श्रीरामाची प्रतिष्ठापना केली जाईल. देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासोबतच त्यांनी रामराज्याचीही कल्पना केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना १० संकल्प घेण्याचं आवाहन केलं.
संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचा सण : यावेळी बोलताना, हा सण अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि क्रोधावर संयमाच्या विजयाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अत्याचारी रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. या भावनेनं आपण दरवर्षी रावण दहन करतो. पण एवढंच पुरेसं नाही. हा सण आपल्यासाठी संकल्पाचाही उत्सव आहे. आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचा हा सण आहे, असं मोदी म्हणाले.
दहन प्रत्येक विकृतीचं असावं : आज रावणाचं दहन हे केवळ पुतळ्याचं दहन असू नये. हे दहन प्रत्येक विकृतीचं असावं ज्यामुळे समाजातील परस्पर सौहार्द बिघडलं आहे. जातीवाद आणि प्रादेशिकतेच्या नावाखाली भारतमातेचं विभाजन करू पाहणाऱ्या शक्तींचं हे दहन असावं. हे दहन त्या विचारांचं असावं ज्या विचारांत भारताचा विकास नसून स्वार्थ आहे, असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.
विजयादशमीच्या दिवशी पंतप्रधानांनी लोकांना हे १० संकल्प घेण्याचं आवाहन केलं :
- येणार्या पिढ्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त पाण्याची बचत करू.
- अधिकाधिक लोकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करू.
- स्वच्छतेच्या बाबतीत आमची गावं आणि शहरं आघाडीवर नेऊ.
- 'वोकल फॉर लोकल'चा मंत्र जास्तीत जास्त अंगीकारू.
- दर्जेदार उत्पादनं बनवू. निकृष्ट दर्जामुळे देशाचा सन्मान आम्ही कमी होऊ देणार नाही.
- प्रथम आमचा संपूर्ण देश पाहू, प्रवास करू. यानंतर वेळ मिळाला तर परदेशात जाण्याचा विचार करू.
- नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक जागरूक करू.
- आमच्या दैनंदिन जीवनात साध्या अन्नाचा समावेश करू. छोट्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
- सर्वजण जीवनात योगासनांना प्राधान्य देऊ.
- किमान एका गरीब कुटुंबातील सदस्य बनून त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर मदत करू.
हेही वाचा :