पणजी - आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजपने आतापासूनच तयारीस सुरुवात केली आहे. आज दुपारी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांनी दक्षिण गोव्यातील मडगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांशी महत्त्वाची बैठक घेऊन दक्षिण गोवा मतदार संघातील तयारी विषयी आढावा ( Review of preparations in South Goa Constituency ) घेतला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजप पक्ष तयारीला लागला आहे. दक्षिण गोवा व उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने उमेदवार चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
ही नावे आहेत चर्चेत - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकले होते. दक्षिण गोव्यातून एडवोकेट नरेंद्र सावईकर तर उत्तर गोव्यातून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा विजय झाला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एक जागा गमवावी लागली. दक्षिण गोव्यातून सावईकर यांचा पराभव झाला, तर उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक पुन्हा एकदा विजयी झाले. मात्र, आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. उत्तर गोव्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर भाजपचे उमेदवार असणार आहेत.