बांका (बिहार) : सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. कधी कधी काही गोष्टी इतक्या मजेदार असतात की त्या पाहिल्यानंतर लोक हसू आवरू शकत नाहीत. बिहारच्या बांका जिल्ह्यातून एक अशीच अनोखी घटना समोर आली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यातील कटोरियाच्या शिक्षकांनी सुट्टीसाठी अर्ज दिला. मात्र त्या अर्जामध्ये त्यांनी 'आईचे निधन होणार आहे, दोन दिवसांनी सुट्टी द्या' असे लिहिले आहे! हा आणि अशाच प्रकारचे अनेक अर्ज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Banka Teacher Leave Application). (Banka Teacher Strange Leave Application).
"माझ्या आईचे निधन होणार आहे" : बांका जिल्ह्यातील धोरैया पोलीस स्टेशन क्षेत्रातील कचारी पिपरा गावातील अजय कुमार यांचा हा अर्ज व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिले आहे की, "प्राचार्य महोदय, माझ्या आईचे सोमवार, ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता निधन होणार आहे. त्यामुळे त्यांच्या अंतिम संस्कारासाठी मी ६ डिसेंबर आणि ७ डिसेंबरला शाळेत गैरहजर राहणार आहे. म्हणूनच सरांना विनंती आहे की कृपया माझी रजा मंजूर करावी ही नम्र विनंती."
"मी चार दिवसांनी आजारी पडेन, दोन दिवसांची सुट्टी हवी" : बराहत येथील खडियारा उर्दू विद्यालयाचे शिक्षक राज गौरव यांनी लिहिलेला आणखी एक अर्ज व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिले आहे की, "मी 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला आजारी असेल. त्यामुळे मी शाळेत येऊ शकणार नाही. म्हणूनच प्रासंगिक रजा मंजूर करावी." हा अर्ज 1 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी लिहिला गेला आहे.
"मला लग्नाला जायचे आहे, पोट बिघडण्याची शक्यता आहे" : कटोरिया येथील जामदहाच्या माध्यमिक शाळेचे शिक्षक नीरज कुमार यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे प्रासंगिक रजेबाबत अर्ज केला. ज्यात त्यांनी लिहिले, "मी 7 डिसेंबर रोजी एका लग्न समारंभात सहभागी होणार आहे. मला माहीत आहे की मी लग्न समारंभात जेवणाचा खूप आस्वाद घेईन आणि मग पोटदुखी होणारच. म्हणूनच कृपया तीन दिवस अगोदर अर्ज स्वीकारा." अर्ज मुख्याध्यापकांनी नाकारला आहे.
काय होते आयुक्तांचे नवे आदेश : भागलपूरचे आयुक्त दयानिधन पांडे यांच्या आदेशानंतर असे अर्ज येत असल्याचे बोलले जात आहे. ज्यात आयुक्तांनी प्रासंगिक रजेपूर्वी मान्यता घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. हा आदेश तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता. यानंतर भागलपूर डीईओ आणि बांका डीईओ यांनी यासंदर्भात आदेश पत्र जारी केले. त्यानंतर प्रशासकीय आदेश आणि शिक्षकांचे अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय लिहिले होते आदेशात : मात्र, या संपूर्ण आदेशामागील सत्य काही वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, भागलपूर आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात असे लिहिले होते की, शाळांची तपासणी केली असता शाळेतील एकापेक्षा जास्त शिक्षकांना एकाच वेळी सुटी देण्यात आल्याने अध्यापनाच्या कामावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत शिक्षकांना एकत्र रजा देऊ नये. यासोबतच मुख्याध्यापकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच रजा मंजूर करावी, असेही आदेशात लिहिले होते.