नवी दिल्ली - देशाचा शेतकरी छातीवर गोळी झेलण्यास तयार आहे. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे आणि दिलगिरी व्यक्त करावी. सरकारने कायदे मागे घेतले तर काहीही बिघडणार नाही. सरकारने फक्त दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असे भाकीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले. सरकारमधील काही लोक शेतकऱ्यांसोबत आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासारखे लोकही मोदी सरकारवर नाराज आहेत. आमचे खासदार घाबरलेले असून त्यांना शेतकर्यांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, असे नरेश टिकैत म्हणाले.
भाजपाची हुकूमशाही चालणार नाही -
आमच्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच शेतकरी आंदोलन हे राजकीय नाही. मात्र, राजकीय पक्षांनी पुढे यावे. राजकीय पक्षांचे काम सरकारच्या चुकीच्या विरोधात आवाज उठवणे हे आहे. भाजपा राजकारण करीत असून त्यांची हुकूमशाही चालणार नाही, असे नरेश टिकैत म्हणाले.
शेतकऱ्यांना कमकुवत समजू नये -
अनेक पोलीसही आमच्यासोबत आहेत. 200 पोलीस कर्मचारी राजीनामा देण्यास तयार आहेत. तसेच संपूर्ण देशातील शेतकरी आज आमच्या पाठीशी आहेत. सरकारने आम्हाला कमकुवत मानू नये. आम्ही छातीवर गोळी झेलण्यास तयार आहोत, असे नरेश टिकैत म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी गालबोट -
गेल्या दोन महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनातून माघार घेत घराची वाट धरली. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन ऐकून हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशमधून शेतकरी मोठ्या संख्येने पुन्हा गाझीपूर, सिंघू सीमेवर येत आहेत.