नवी दिल्ली : सौदी अरेबियाचे माजी न्याय मंत्री अल-इसा हे इस्लामवर भाष्य करणारे अग्रगण्य विचारवंत आहेत. ते मंगळवारी म्हणाले की, 'भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हा देश त्याबाबतीत एक उत्कृष्ट मॉडेल आहे. तो जगाला शांतीचा संदेश पाठवू शकतो'. ते पुढे म्हणाले की, 'आम्ही गेल्या काही दिवसांपासून भारतीय समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहोत. भारतातील मुस्लिमांना संविधानाचा अभिमान आहे. त्यांना त्यांच्या राष्ट्राचा अभिमान आहे'.
इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरला भाषण : अल-इसा हे सध्या मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL) चे सरचिटणीस आहेत. ही सौदी अरेबियामध्ये स्थित एक संघटना आहे, जी जगभरातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते. ते खुसरो फाऊंडेशनने नवी दिल्लीच्या इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाषण देत होते. अल-इसा 10 जुलैपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
भारतीयांनी मानवतेसाठी खूप योगदान दिले : भारतीयांचे कौतुक करताना अल-इसा म्हणाले की, आम्ही भारतीय आणि त्यांच्या हुशारीबद्दल बरेच काही ऐकले आहे. त्यांनी मानवतेसाठी खूप योगदान दिले आहे. ते म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की येथे सहअस्तित्व खूप महत्वाचे आहे. आम्ही देखील जगभरात स्थिरता आणि सुसंवाद वाढविण्यावर काम करत आहे. भारत भेटीवर आलेल्या अल-इसा यांनी सांगितले की, त्यांची संस्था जगभरात धार्मिक जागृतीसाठी काम करत आहे.
अल-इसा यांचा भारत दौरा : अल-इसा सोमवारी भारतात आले. ते आपल्या भेटीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेणार आहेत. तसेच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. ते भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (ICCR) प्रतिनिधींना भेटतील आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या नेत्यांशी संवाद साधतील. सूत्रांनी सांगितले की, ते ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला जाणार आहेत. तसेच ते अक्षरधाम मंदिरालाही भेट देऊ शकतात आणि काही प्रमुख व्यक्तींची भेट घेऊ शकतात. नवी दिल्लीतील त्यांच्या मुक्कामादरम्यान ते शुक्रवारच्या नमाजासाठी जामा मशीदीला भेट देणार आहेत.
हेही वाचा :