भोपाळ : मध्य प्रदेशच्या एका रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. रुग्णालयाने चक्क एका मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबीयांना दिल्याची घटना समोर आली आहे. भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेव्हा हे मुस्लिम कुटुंबीय या महिलेचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात गेले, तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार समजला. दरम्यान, हिंदू कुटुंबीयांनी त्यांना मिळालेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्कारही केल्याचे सांगण्यात येत आहे.
हमीदियाचे रुग्णालयाचे अधीक्षक आय.डी. चौरसिया यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत कारवाीचे आश्वासन दिले. ते म्हणाले, की ज्या कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही चूक झाली आहे त्याला तात्काळ कामावरुन कमी करण्यात येईल. तसेच, अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नसल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
मुस्लिम कुटुंबीयांचा वॉर्डबॉयवर आरोप..
मुस्लिम कुटुंबीयांनी हे सगळं मुद्दाम केलं गेल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी वॉर्डबॉयला जबाबदार ठरवलं आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ते करत आहेत.
आता अस्थींचे करणार दफन..
हिंदू कुटुंबीयांनी आपले नातेवाईक समजून या मुस्लिम महिलेचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे आता त्या अस्थींचेच दफन करण्याचा पर्याय आपल्याकडे राहिला असल्याचे मुस्लिम कुटुंबीयांनी म्हटले. या दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांशी बोलून हा तोडगा काढला आहे. पोलिसांनीही मुस्लिम कुटुंबीयांना कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा : नवी मुंबई पालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार; तरुण-तरुणीच्या मृतदेहांची अदला-बदल