मुंबई / देहरादून: बुली बाई अॅप प्रकरणी उत्तराखंडमधील रुद्रपूरमधून १८ वर्षाच्या महिलेला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिचे नाव श्वेता सिंग आहे. तिला मुंबईलाआणण्यात येणार आहे. या अॅप प्रकरणात पकडलेली महिला बुली बाई प्रकरणाची मास्टर माईंड असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल बेंगलोर मधून 21 वर्षीय इंजिनियर विशाल कुमार याला अटक करण्यात आली होती. विशाल कुमार याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मास्टर माईंड ही महिला असल्याचे समोर आले या महिलेला मुंबईत आणण्यात येणार आहे.
ॲप होस्टिंग प्लॅटफाॅर्मच्या उत्तराची वाट
दिल्लीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि जनसंपर्क अधिकारी चिन्मय बिस्वास यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, 1 जानेवारी रोजी मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही ॲप होस्टिंग प्लॅटफाॅर्मशी संपर्क साधला आहे. आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल सध्या तपास सुरु आहे. होस्टिंग प्लॅट फाॅर्म परदेशात आधारित आहेत. दिल्ली पोलिसांना जीएनसीटी कडून म्युच्युअल लीगल असिस्टन्स इन क्रिमीनल मॅटर साठी परवानगी मिळाली आहे असेही त्यांनी सुली सौद्याबाबत बोलताना सांगितले.
तो तरुण सायबर पोलिसांच्या कोठडीत
ॲप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय विशाल कुमारची वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १० जानेवारी पर्यंत सायबर पोलिसांच्या कोठडीत रवानगी केली आहे. मुंबई पोलिसांना बंगळुरूमधील कुमारच्या परिसराची झडती घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुस्लीम महिलांना केले टार्गेट
बुली बाई अॅपवरून मुस्लीम महिलांना टार्गेट केले जाते. तसेच या महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून उचलून त्यांना ट्रोल करण्यात येते. या फोटोंचा लिलाव देखील करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली, व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणीही केली होती. तसेच महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर महिलांची बदनामी आणि सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करत मुंबई पोलिसांनी तपास केला.
महिला हाताळत होती ३ अकाऊंट
मुख्य आरोपी महिला 'बुली बाई' अॅपशी संबंधित तीन अकाऊंट हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमारने खालसा वर्चस्ववादी नावाने खाते उघडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांनी इतर खात्यांची नावे बदलली होती असंही समोर आले आहे.
दोन्ही आरोपींची ओळख
बंगळुरूमधून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची आज कसून चौकशी करण्यात आली. यामागे मोठी टोळी आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला. मुख्य आरोपी एक महिला असल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने उत्तराखंडमधून महिलेला ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
आयपीसी, आयटी कायद्यानुसार गुन्हा
मुंबई सायबर पोलिसांनी १०० प्रमुख मुस्लिम महिलांचे फोटो लिलावासाठी अपलोड केल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू केली आहे. पश्चिम विभागीय सायबर पोलीस स्टेशनने आयपीसी कलम १५३ (ए) (शत्रुता पसरवणे), १५३ (बी) ( राष्ट्रीय एकात्मतेवर आघात करणे) २९५ (ए) (धार्मिक भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. ५०९ (लैंगिक छळ) ५००(बदनामी) तसेच IT कायदा कलम ६७ अंतर्गत (अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करणे) अॅप डेव्हलपर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
विस्तृत माहिती गोळा केली जात आहे
बुली बाई अॅप प्रकरणात सह-संचालक असलेल्या महिलेला मुंबई पोलीसांनी उधम सिंह नगर येथे अटक केली आहे. या प्रकरणा संदर्भात सध्या उत्तराखंड पोलीसांकडे कसलीही माहिती नाही. मात्र त्यांनी मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे. पोलीस मुख्यालयातील डीआयजी सेंथिल अबूदई यांनी म्हणले आहे की, या सगळ्या प्रकरणाची विस्तृत माहिती आमच्याकडे नाही माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.