भोपाळ - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना शुक्रवारी दिल्लीतील एम्स रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
शुक्रवारी रात्री अचानक तब्येत खालावल्याने त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्या असून ती नकारात्मक आली आहे. मात्र, श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्या सध्या रुग्णालयातच आहेत. त्यामुळे शनिवारी मुंबईतील एनआयए न्यायालयामध्ये सुनावणीवेळी त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
सीहोरच्या खासदार -
साध्वी भोपाळच्या सीहोर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. 2008 च्या मालेगाव स्फोटानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. यांसदर्भात त्यांना अटकही झाली होती. याप्रकरण गेल्या शनिवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने प्रज्ञा आणि इतर आरोपींना सुनावणी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्या गैरहजर राहिल्या.
मालेगाव स्फोट -
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये लावलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन सहा जण ठार तर, 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी 475 साक्षीदार आहेत. अजूनही 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्यामुळे या संदर्भात न्यायालयाकडून नियमित सुनावणी सुरू आहे.
हेही वाचा - 'आंदोलनात शेतकरी नसून काँग्रेसी अन् डावे लोक, त्यांना तुरुगांत डांबा'