उदयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील नई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. खेळता खेळता एक मुलगा घराजवळील उघड्या विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी आई आणि तिच्या दोन्ही मुलांनी विहिरीत उडी घेतली. दुर्दैवाने विहिरीत बुडून चौघांचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहांना विहिरीतून बाहेर काढले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले : नाई पोलिस स्टेशनचे अधिकारी श्याम रत्नू यांनी सांगितले की, ही घटना नाई पोलिस स्टेशन हद्दीतील बाछार गावातील आहे. येथे एक मूल विहिरीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दोन मुलांसह आईनेही विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडून सर्वांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात हलवले आहेत.
पोलिसांचा तपास सुरु : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत मुलांचे वय सुमारे 8, 10 आणि 12 वर्षे आहे. तर मृत पावलेल्या महिलेचे वय सुमारे 30 वर्षे आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधीही रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत. एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने अख्या गावात शोककळा पसरली आहे.
तलावात बुडून चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू : दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या डुंगरपूर शहरातील पटेल तलावात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अंघोळ करताना पाण्यात खूप खोल गेल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन अधिकारी सुरेंद्र सोलंकी यांनी सांगितले की, मृतक अक्षत भाटिया हा डुंगरपूर शहरातील वखारिया चौकात राहत होता. तो विद्या निकेतन शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील शवागारात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा : Bihar Hooch Tragedy : बिहारमध्ये बनावट दारूमुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची शक्यता