बंगळुरू : अंधश्रद्धेतून आईसह तिच्या नवजात बालकाला गावाबाहेर ठेवल्याची आणखी एक घटना उघडकीस आल्यानं कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना गुब्बी तालुक्यातील गोल्लारहट्टी येथे घडली. अंधश्रद्धेतून आई आणि चिमुकल्याला गावाबाहेर काढल्याची माहिती मिळताच गुब्बी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनास्थळी भेट देऊन अंधश्रद्धेची प्रथा बंद करत पीडित मायलेकाची सुटका केली. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे आई आणि मुलाला झोपडीत ठेवलं असताना आजारानं मुलीचा मृत्यू झाला होता.
अंधश्रद्धेतून आई आणि मुलाला काढलं गावाबाहेर : गोल्हारहट्टी येथील एका महिलेनं चिमुकल्या बाळाला जन्म दिला होता. मात्र या आई आणि चिमुकल्याला घरी आणण्याऐवजी त्यांना गावाबाहेर काढण्यात आलं होतं. गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून त्यात त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
न्यायाधीशांनी केली सुटका : आई आणि बाळाला गावाच्या बाहेर काढण्यात आल्याची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती मिळताच बुधवारी गुब्बी येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश उंडी मंजुळा शिवप्पा यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी चिमुकल्या मुलाला आणि आईला ठेवलेल्या ठिकाणाची पाहणी करत त्यांची सुटका केली. गेल्या काही दिवसांपासून या आई आणि चिमुकल्या मुलाला गावाबाहेरील झोपडीत ठेवण्यात आलं होतं. न्यायाधीश उंडी मंजुळा शिवप्पा यांनी मुलाला उचलून घरी आणलं. यावेळी त्यांनी असा प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.
सुतकात जन्म दिल्यानं काढलं गावाबाहेर : गोल्हारहट्टी या गावात सुतकात बाळाला जन्म दिल्यास त्यांना गावाबाहेर ठेवण्यात येत आहे. कडुगोल्ला सामाजात ही अंधश्रद्धा पाळण्यात येते. हिंदू परंपरेनुसार 'सूतक' हा काळ अशुभ मानला जातो. या काळात ग्रहांची हालचाल अनुकूल नसल्याचा समज आहे. या काळात जन्म किंवा मृत्यू झाल्यास घरात संकटं येतात, अशी धारणा आहे. त्यामुळे आईनं बाळाला जन्म दिल्यानं तिला घराबाहेर काढण्यात आलं होतं.
अंधश्रद्धेमुळे गेला चिमुकल्याचा बळी : गोल्हारहट्टी या गावात महिन्याभरापूर्वी एका आईला व चिमुकल्याला अंधश्रद्धेतून गावाबाहेर एका झोपडीत डांबून ठेवलं होतं. कडुगोल्ला समाजानं त्यांच्या प्रथेप्रमाणं आई आणि मुलाला सूतक म्हणून झोपडीत ठेवलं. मात्र मुसळधार पावसात थंडीनं मुलगी आजारी पडल्यानं तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.
अंधश्रद्धा सोडून देण्याचं नागरिकांना आवाहन : या घटनेनंतर तुमकूर तहसीलदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी गोल्लारहट्टीला भेट दिली. तहसीलदार सिद्धेश, आरसीएच मोहन, टीएचओ लक्ष्मीकांत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचं समुपदेशन केलं. महिला आणि मुलाला घरी ठेवून अशा अंधश्रद्धा सोडून देण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं. बालकाचा मृत्यू झाल्यानं वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नुरुन्नीसा यांनीही गोल्लारहट्टी येथे अचानक भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, तरीही अंधश्रद्धा कायम आहे.
हेही वाचा -
Aurangabad Crime: तांत्रिकाच्या नादी लागून आईचा मुलीला जाळण्याचा प्रयत्न, वाचा काय होते कारण...