अहमदाबाद - रविवारी संध्याकाळी अहमदाबाद शहरातील संपूर्ण परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचबरोबर साणंद तालुक्यातील विरोचननगर गावाला वादळाचा मोठा फटका बसला. ज्यामध्ये संपूर्ण गावातील 20 हून अधिक घरांची पडझड झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे व विजेचे खांब उन्मळून पडल्याने आजूबाजूच्या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय, वादळाच्या तडाख्याने 8 जण जखमी झाले, त्यांना 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाने कहर केला आहे. राज्यात अहमदाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे. काल सानंद तालुक्यात मोठा पाऊस झाला. या पावसात विरोचननगरमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. काही कच्ची घरे या पावसाने जमीनदोस्त केली.
मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर वादळामुळे मोठ्या नुकसानीला लोकांना सामोरे जावे लागले आहे. घरे पडल्याने त्यांच्या दारात लावलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये रिक्षा तसेच दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
घरे पडल्याने त्यातील लोकही जखमी झाले आहेत. यामध्ये 8 जणांना दवाखान्यात न्यावे लागले. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन काळजी घेत आहे. पावसामुळे नुकसान झालेल्यांनी मदतीची मागणी केली आहे.