नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी गोव्यातील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा (Mopa airport in Goa) याचे नामकरण 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' (Manohar international airport) असे करण्यास मान्यता दिली आहे. सरकारने गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे. (airport in Goa to be named after Manohar Parrikar). मोपा येथील ग्रीनफिल्ड विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते.
मंत्रीमंडळाचा सर्वानुमते निर्णय : सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "गोव्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ - मोपा, गोवा' असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाने सर्वानुमते याला मान्यता दिली आहे. आधुनिक गोव्याच्या उभारणीत दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या नावावरून विमानतळाचे नाव देण्यात आले आहे."