नवी दिल्ली - कोणी जर हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा; त्या त्याच्या मूळ स्वभावातच असते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जीवनावर लिहलेले 'मेकिंग ऑफ ए हिंदू पैट्रियट' या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
जेके बजाज आणि एमडी श्रीनिवास यांनी लिहले पुस्तक-
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत राजघाटावर आयोजित समारंभात जेके बजाज आणि एमडी श्रीनिवास यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना संघप्रमुख भागवत पुढे म्हणाले, की महात्मा गांधीच्या जीवनावर लिहण्यात आलेले हे पुस्तक म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे गांधी विचार व्यक्त करणारे संशोधन आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनावरून अनेक तर्क वितर्क काढले जातील. मात्र, त्याची गरज नाही.
देशभक्तीची प्रवृत्ती प्रत्येकांमध्ये-
या समारंभात भागवत पुढे म्हणाले, कोणताही हिंदू, भारत द्रोही किंवा भारत विरोधी होऊ शकत नाही. तसेच देशभक्तीची प्रवृत्ती प्रत्येकांमध्ये असते. भारतातील नागरिक या भूमिला आपली मानतात. या मातीची कोणत्या कोणत्या रुपाने पूजा केली जाते. मात्र, गांधीजींनी माझी देशभक्ती माझ्या धर्मातून स्पष्ट होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोणताही हिंदू देशविरोधी नसतो; जो हिंदू आहे तो देशभक्त असायलाच हवा, फक्त त्याच्या निद्रीस्त देशभक्तीला जागृत करणे गरजेचे आहे.
आपण एकाच धरतीचे पूत्र-
महात्मा गांधी म्हणत की, स्वराज्याची मागणी करणारे अनेक आहेत. मात्र स्वराज म्हणजे जो पर्यंत तुम्ही आपला स्वधर्म समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वराज्य समझू शकणार नाहीत, असे सांगत भागवत म्हणाले की, असमहित याचा अर्थ फुटीरतावाद नाही. आपणास मिळून मिसळून राहायला हवे. आपण एकाच धरतीचे पूत्र म्हणून राहू शकतो.