नई दिल्ली: आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाचा पहिला सामना केकेआर विरुद्ध सीएसके ( KKR vs CSK )संघात होणार आहे. या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी सीएसकेचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( All Rounder Moeen Ali ) खुप धरपड करत होता. परंतु मागील काही दिवसात त्याला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. मात्र आता मोईन अलीला आयपीएल स्पर्धेसाठी भारताचा व्हिसा मिळाला आहे. याबाबतची माहिती चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनाी गुरुवारी दिली आहे. त्याचबरोबर मोईन अली भारतात येण्यासाठी रवाना झाला आहे.
अष्टपैलू मोईन अली चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने मागील हंगामात चेन्नई संघासाठी शानदार कामगिरी केली होती. मोईनने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 15 सामन्यात 357 धावा आणि सहा विकेट घेतल्या होत्या. मोईन अली भारतात जरी रवाना झाला असला, तरी तो कोलकात्या विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. तो दुसऱ्या सामन्याच्या संघ निवडीला उपलब्ध असणार आहे.
इंग्लंडचा हा खेळाडू गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहे. पण संघात सामील होण्यापूर्वी त्याला तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. यामुळे तो शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. विश्वनाथन यांनी पीटीआयला सांगितले की, मोईनला व्हिसा मिळाला असून तो आज मुंबईला पोहोचेल. तीन दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंच्या व्हिसाच्या नियमांमुळे त्याचा व्हिसा मिळण्यास विलंब झाला. मोईनचे आजोबा पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले होते. पण मोईनचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून तो वारंवार क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत असतो. सीएसकेचा दुसरा सामना 31 मार्चला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे आहे.
हेही वाचा - Csk New Captain : धोनीने कर्णधार पद सोडले; चेन्नईची धुरा आता रविंद्र जडेजाकडे