वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात कुठेही फिरू शकतात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये येऊन दोन तासाच्या अंतरावर लखीमपुरला जाऊ शकत नाहीतका? येथील शेतकऱ्यांच्या घरातील चार लोकांना गाडीखाली चिरडून मारले असताना आपल्या शेतकऱ्यांप्रती भावना व्यक्त करण्याला ते दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत, अशी खंत प्रियंका यांनी व्यक्त केली आहे. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीत शेतकरी न्याय रॅलीला काल(दि. 10 ऑक्टोबर)रोजी संबोधित केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. येथील रोहनियाच्या जगतपूर आंतर महाविद्यालयाच्या मैदानावर ही शेतकरी न्याय रॅली आयोजीत करण्यात आली होती. यावेळी लाखोंचा जनसमुदाय सभेला उपस्थित होता.
ज्यांची मुलगी मारली गेली तीचे अंत्यसंस्कारही तीच्या कुटुंबाला करू दिले नाहीत
प्रियंका गांधी यांनी शेतकरी न्याय रॅलीला संबोधित करण्यापूर्वी येथील काशी विश्वनाथ मंदिर आणि आई कुष्मांडाच्या दरबारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्या शेतकरी रॅलीकडे रवाना झाल्या. दरम्यान, हातरससारखे बलात्काराचे गंभीर प्रकरण घडले होते. त्यामध्येही सरकारने गुन्हेगारांना रोखण्याचेच काम केले. इतकेच काय तर ज्यांची मुलगी मारली गेली तीचे अंत्यसंस्कारही तीच्या कुटुंबाला करू दिले नाहीत अशी खंतही प्रियंका यांनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी आम्हाला त्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यात आले. मात्र, मोठे प्रयत्न करून आम्ही पोहचलो. त्यावेळी त्या कुटुंबाने कोणत्याही आर्थिक मदतीपेक्षा आम्हाला न्याय हवा आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, दीदी आम्ही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली अस प्रियंका गांधी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान लखनऊला येऊ शकतात तर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी लखीमपूरला येऊ शकत नाहीतका?
एखादी व्यक्ती सहा लोकांना चिरडून मारते आणि पोलीस त्यांना विनंती करतात की, या आपण चर्चा करू, कोणत्या देशात अशा घटना घडतात. सबंध जगात असे घडले नसेल. येथील मुख्यमंत्री सरळ-सरळ या गुन्हेगारांना वाचवत आहेत असा आरोपही प्रियंका यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, जे पंतप्रधान लखनऊ येऊ शकतात ते त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन तास दूर लखीमपूरला येऊ शकले नाहीत ही कसली संवेदनशीलता असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. हा देश एक विश्वास आहे, एक आशा आहे, न्यायाच्या आशेवर या देशाला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढायला गेले, तेव्हा प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे हे त्यांच्या मनात होते. आपले संविधान न्यायावर आधारित आहे, पण प्रत्येकाने या देशात न्यायाची आशा सोडली आहे असही प्रियंका यावेळी म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्रात आज राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद