अशोकनगर (मध्य प्रदेश) : गेल्या काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी 30 ते 40 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आज 150 ते 170 रुपये किलो दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत मध्य प्रदेशच्या अशोकनगर येथील एका मोबाईल विक्रेत्याने अनोखी ऑफर आणली आहे. या दुकानातून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुकानदार 2 किलो टोमॅटो मोफत देत आहेत.
ग्राहकांना दुकानदाराची अनोखी ऑफर : हे संपूर्ण प्रकरण अशोकनगरच्या स्टेशन रोडवरील एका मोबाईल शोरूमशी संबंधित आहे. या दुकानाचा मालक अभिषेक अग्रवाल दुकानात येणाऱ्या ग्राहकांना 2 किलो टोमॅटो भेट म्हणून देत आहेत. ही ऑफर ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर आता ग्राहकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
स्मार्टफोन खरेदी केल्यास टोमॅटो फ्री : सध्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातही विशेष म्हणजे टोमॅटोच्या दराने उच्चांकाचा विक्रम मोडला आहे. टोमॅटोचा सध्याचा बाजारभाव 160 रुपये किलो आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या मोबाईल दुकानदाराने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली आहे. येथे स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो भेट म्हणून दिले जात आहेत.
'ही योजना सुरू होताच दुकानात ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्हाला नफाही होत असून ग्राहकही टोमॅटो मिळाल्याने खूश आहेत. मला वाटते की मोबाईलसोबत एक किलो टोमॅटो लोकांच्या घरी पोहोचला तर त्यांना थोडा दिलासा मिळेल. - दुकानदार
ग्राहकांना ऑफर भावली : पावसाळ्यात स्थानिक पातळीवर टोमॅटोचे पीक पूर्णपणे संपते. त्यामुळे इंदूरचा टोमॅटो अशोकनगरला येतो. इंदूर ते अशोकनगर भाडे जास्त असल्याने टोमॅटोचा भावही वाढतो. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून टोमॅटोचा भाव 120 ते 160 रुपये किलो झाला आहे. मात्र आता या दुकानदाराने दिलेल्या ऑफरनंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा :