बरगढ (ओडिशा) Mob lynching : ओडिशातील बरगढ जिल्ह्यात मॉब लिंचिंगची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी आहे.
एकाचा जागीच मृत्यू : पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी (२१ नोव्हेंबर) बरगढ जिल्ह्यातील साहुतिक्रा गावात काही महाविद्यालयीन विद्यार्थी घरी परतत असताना वाटेत चार तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी याची माहिती त्यांच्या पालकांना दिली. तेव्हा गावकऱ्यांनी या चार तरुणांना पकडलं. यापैकी एक तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित तिघांना जमावानं बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला.
एकाची प्रकृती चिंताजनक : तिसऱ्या तरुणावरही जमावानं हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची जीवन मरणाची लढाई सुरू आहे. विजय बाग असं जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, तो पंढरीपठार गावाचा रहिवासी आहे. तर बिकू जल असं दुसऱ्या मृत तरुणाचं नाव आहे. तो संबलपूरचा राहणारा आहे.
बरगढ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ : मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंभीर अवस्थेतील दरोडेखोरांना जमावाच्या तावडीतून वाचवून बरगढ रुग्णालयात नेण्यात आलं. बरगढ जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, दरोड्यासारख्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या आधी १८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा धांगेर येथे काही लोकांनी चोरट्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
हेही वाचा :