अलवर (राजस्थान) : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात शुक्रवारी मॉब लिंचिंगची घटना समोर आली. या घटनेत एकाचा मृत्यू झालाय. लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांवर गुरुवारी 8 - 10 जणांनी मिळून हल्ला केला होता. यामध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख पटली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय.
दोन जखमींवर उपचार सुरू : एएसपी जगराम मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जखमींवर उपचार सुरू असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गुरुवारी रात्री वसीम (27), त्याच्या मामाचा मुलगा आसिफ आणि अझरुद्दीन हे जिल्ह्यातील हरसोरा पोलीस स्टेशन हद्दीतील नारोल गावात झाडे तोडण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांना वनविभागाचे वाहन परिसरात गस्त घालत असल्याची माहिती मिळाली. यानंतर हे लोक पिकअप वाहनाने हरसोराकडे परतत होते.
8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल : दरम्यान, नारोळ गावात विभागाच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून जेसीबीद्वारे पिकअप वाहन थांबवले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पिकअप वाहनात बसलेल्या लोकांवर हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या वसीमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आसिफ आणि अझरुद्दीन जखमी झाले. या घटनेत वनविभागाच्या वाहनासह जेसीबी स्वारांनी हाणामारी केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांद्वारे करण्यात आलीय. या घटनेनंतर 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय.
4 जणांना ताब्यात घेतले : अलवरमध्ये मॉब लिंचिंगमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल टीमला पाचारण केले. कोतपुतली एसपी डॉ. रंजिता शर्मा यांनी बीडीएम रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय.
हेही वाचा :