इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. आता या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला असून एफआयआरमध्ये म्हटले आहे की, महिलांचे अपहरण करण्यापूर्वी पुरुषांचा एक गट कांगपोकपी जिल्ह्यातील गावात आला आणि त्यांनी तेथील घरे जाळली. तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार केला व काही लोकांना ठारही मारले. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, जमावाने एका व्यक्तीला ठार मारले, कारण त्याने 4 मे रोजी या दोन महिलांवर बलात्कार होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
आत्तापर्यंत चार जणांना अटक : एके रायफल्स, SLR, INSAS, आणि .303 रायफल्स यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन सुमारे 900-1000 लोक कांगपोकपी गावात जबरदस्तीने घुसले. हिंसक जमावाने घरांची तोडफोड केली आणि सर्व मालमत्ता लुटल्यानंतर घरे जाळली, असे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. तसेच जमावाने पोलिसांच्या ताब्यातून पाच जणांना हिसकावून घेतले, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे. 19 जुलै रोजी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
एका महिलेचा पती कारगिल युद्धात लढला होता : व्हिडिओ समोर आल्यानंतर एका दिवसात ही अटक करण्यात आली आहे. या संबंधातील तक्रार 21 जून रोजीच कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या दोन महिलांपैकी एका महिलेचा पती कारगिल युद्धात देशासाठी लढला आहे. त्याने भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून काम केले होते. तसेच तो श्रीलंकेत भारतीय शांतता दलाचाही भाग होता. 'मी देशाचे रक्षण केले, पण मी माझ्या पत्नीचे, सहकाऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे रक्षण करू शकलो नाही, अशी खंत त्याने स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
आत्तापर्यंत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू : मेतेई समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करण्याच्या निषेधार्थ मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मे महिन्यापासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत 150 हून अधिक लोकांनी जीव गमावाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 53 टक्के लोकसंख्या मेतेई आहे, जे मुख्यत: इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर आदिवासी, ज्यात नागा आणि कुकी यांचा समावेश आहे त्यांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे. ते मुख्यत: डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
हेही वाचा :