भोपाळ - मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील पथरिया येथील आमदार रामबाई सिंह यांनी दहावीची परीक्षा दिली. बहुजन समाज पार्टी (बसपा) कडून निवडणूक लढलेल्या रामबाई सिंह यांनी फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. राज्यातील मुक्त शिक्षण मंडळातून त्यांनी आता दहावीची परीक्षा दिली.
जिल्ह्यातील जेपीबी स्कूलमध्ये रामबाई सिंह यांनी विज्ञान विषयाची परीक्षा दिली. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात बसवले जाते. तसेच एका सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्यांनी कक्षात बसून परीक्षा दिली. परीक्षा कक्षाच्या बाहेर त्यांच्या सुरक्षारक्षेसाठी एक गनमॅन आणि तीन पोलीस कर्मचारी होते. 14 ते 29 डिसेंबरपर्यंत मुक्त शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यात येत आहेत, असे जेपीबी स्कूलचे प्राचार्य राम कुमार यांनी सांगितले. यापूर्वी 2017 मध्ये राजस्थानच्या उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंग मीणा यांनी 2017 मध्ये पदवीच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती.
राजकारणात अंगठेबहाद्दर नेते -
भारताच्या राजकारणात अनेक नेते अशिक्षित आहेत. काही जण अंगठेबहाद्दर, तर काही चौथी आणि पाचवी पास आहेत. सरकारी नोकरीसाठी उच्चशिक्षण आवश्यक आहे, परंतु सरकार चालवण्यासाठी शिक्षणाची कोणतेही बंधन नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये अनेकवेळी अपात्र उमेदवार उभे राहतात. संपत्ती आणि अनेक गैरमार्गांचा वापर करून ते निवडणुका जिंकतात.
हेही वाचा - काश्मीरमध्ये एक अतिरेकी ताब्यात; तर पंजाबमध्ये दोघांचा खात्मा..