तिरुवअनंतपुरम : केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पंडिक्कड भागामध्ये एका अल्पवयीन बलात्कार पीडितेवरच पुन्हा अत्याचार झाल्याचा प्रकार घडला आहे. ही मुलगी नुकतीच निरीक्षण गृहातून बाहेर पडली होती, त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे जिल्ह्यातील महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
यापूर्वी दोन वेळा झाला होता बलात्कार..
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी २०१६मध्ये १३ वर्षांची असताना, आणि २०१७मध्ये १४ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. यासंदर्भात आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच, या मुलीला 'निर्भया चाईल्डकेअर होम'मध्ये ठेवण्यात आले होते.
बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..
यानंतर तिला निरीक्षण गृहातून तिच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले होते. मात्र, या मुलीवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची माहिती बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर निरीक्षण गृहांमधून बाहेर पडणाऱ्या मुलांनी सुरक्षा, देखरेख आणि त्यांचे समुपदेशन या सर्वाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, निरीक्षणगृहांमधील बाल संरक्षण अधिकारी, फील्ड वर्कर, निवारा गृह कर्मचारी आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा : तामिळनाडूत जलिकट्टू खेळादरम्यान तरुणाचा मृत्यू