कासरगोड (केरळ) : केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या भाषणादरम्यान कासरगोड केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यास सुरुवात केल्यावर विद्यार्थ्यांनी प्रेक्षक गॅलरीतून घोषणाबाजी सुरू केली. नरेंद्र मोदी सरकारने देशाची शिक्षण व्यवस्था सर्वोच्च स्थानावर नेली आहे, असे मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हणताच, उपस्थित विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी चालू झाली.
कासारगोड विद्यापीठाचा पदवीदान समारंभ : कासरगोड केंद्रीय विद्यापीठात 2021 आणि 2022 मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन उपस्थित होते. विद्यापीठातून एकूण 1947 विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. केंद्रीय विद्यापीठाच्या परिसरात खास तयार केलेल्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार हे होते. कुलगुरू प्रा. एच व्यंकटेश्वरलू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
युवक काँग्रेसकडून विद्यापीठाबाहेर निदर्शने : यावेळी युवक काँग्रेसनेही कासरगोड सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसबाहेर निदर्शने केली. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या उपस्थितीत कासरगोड केंद्रीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ चालू असतानाचा युवक कॉंग्रेसकडून हा निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र काही वेळानंतर त्यांची सुटका केली गेली.
'नेहरू घराण्याला कायदा लागू होत नाही का?' : केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या देशाचा कायदा नेहरू घराण्याला लागू होत नाही का, असा सवाल केला. या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणारे राहुल गांधी काय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आहेत का, असा प्रश्न देखील त्यांनी केला. व्ही. मुरलीधरन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हा निर्णय तांत्रिक आहे आणि काँग्रेस इतर मार्गांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.