नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात दोन महिन्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. या कारणाने हे सर्व मजूर आपापल्या गावी परत जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत होते. काही लोक चालत तर काही वाहनाच्या माध्यमातून आपल्या गावी निघाले. काही दिवसांनी या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी शासनाकडून वाहतूक उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी ई-पासचाही नियम लागू झाला. या सर्वांची तपासणी करून त्यांना गावी जाण्याची परवानगी देण्यात येत होती.
विविध राज्यांतील रोजंदारीवर काम करणारे मजूर स्वगृही परतले
बरेच स्थलांतरित मजूर लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात अडकले होते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला सुरक्षेच्या दृष्टीने घरी परत जायचे होते. अनेक संकटांवर मात करत मजूर आता त्याच्या घरी पोहोचले. परंतु घरवापसीनंतर अनेक समस्यांनी ते त्रस्त झाले. रोजगार नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. लॉकडाऊननंतर घरी परतण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना केलेल्या देशातील जवळपास प्रत्येक मजुरांची ही कहाणी आहे. दु:ख भोगल्यानंतर हे लोक त्यांच्या घरी पोचले. परंतु, आता या स्थलांतरितांसमोर सर्वात मोठे संकट म्हणजे त्यांच्या क्षेत्रात रोजगार शोधणे आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे हे होते. लॉकडाऊन संपून हळूहळू सर्व क्षेत्रांमधील कामे सुरू होऊ लागल्यानंतर या मजुरांना दिलासा मिळाला.