पणजी - गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मगोपचे पाठिंब्याचे पत्र मिळाले आहे. मगोप राज्यातील स्थापन होणाऱ्या नवीन सरकारचा भाग असणार आहे, असे भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.
विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी शुक्रवारी पक्षाची बैठक
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी होणार आहे.
युती न करता 20 जागा मिळाल्या - प्रमोद सावंत
मला गोव्यातील जनतेचे आभार मानायचे आहेत. आम्ही 22 मागितले होते पण आम्ही कमी पडलो. आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. इथे येणाऱ्या सर्व नेत्यांनाही श्रेय द्यायचे आहे. आम्ही येथे 10 वर्षे होतो. सत्ताविरोधी लाट असल्याचे अनेकांनी सांगितले, मात्र विकासकामांमध्ये आमचाच विजय होईल, असा विश्वास होता. कोणतीही युती न करता आम्हाला 20 जागा मिळाल्या आहेत. मतदानाचा वाटा देखील 34.3% आहे त्यामुळे आम्ही आमचा आधार देखील वाढवला आहे.
गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार
भाजपच्या आजच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानले. यावेळी त्यांनी गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. फडणवीसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल आभारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. असेच सहकार्य इथून पुढे रहावे, अशी इच्छाही सावंत यांनी दर्शवली.
फ्लोर टेस्टसाठी जाऊ तेव्हा आमच्याकडे जास्त जागा मिळण्याची शक्यता
सध्या आमच्याकडे 20+5 जागा आहेत, परंतु विधानसभेत आम्ही फ्लोर टेस्टसाठी जाऊ तेव्हा आमच्याकडे जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, असेही भाजप गोवा डेस्क प्रभारी सीटी रवी म्हणाले.