शिलाँग : सोमवारी रात्री पश्चिम मेघालयातल्या तुरा शहरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी 18 जणांना अटक केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या दोन पदाधिकाऱ्यांही समावेश आहे. या घटनेत पाच पोलीस जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना कोणतीही दुखापत नाही : हा हल्ला झाला तेव्हा मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा हे अचिक कॉन्शियस होलिस्टिकली इंटिग्रेटेड क्रिमा (ACHIK) आणि गारो हिल्स स्टेट मूव्हमेंट कमिटी (GHSMC) च्या नेत्यांसोबत बैठक घेत होते. ह्या संघटना तुराला राज्याची हिवाळी राजधानी बनवण्याची मागणी करत आहेत. या हल्ल्यानंतर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. मात्र, त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांना या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही.
21 वाहनांचे नुकसान झाले : स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, 'दोन महिलांसह 18 जणांना सोमवारी रात्री तुरा येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. घटनेत किमान 21 वाहनांचे नुकसान झाले आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत'. ते म्हणाले की, 'बेलीना एम. मराक आणि दिल्चे च मराक अशी अटक करण्यात आलेल्या भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
जखमी पोलिसांना 50 हजार रुपयांची मदत : अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी जमावाला हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तृणमूल काँग्रेसच्या दोन नेत्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमी पोलिसांना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते धोक्याबाहेर आहेत. हिवाळी राजधानीची मागणी करणाऱ्या आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने बाहेरील लोक सामील झाले होते, ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.
तुरा शहरात रात्रीचा कर्फ्यू लागू : आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा उपायुक्त जगदीश चेल्लानी यांनी या घटनेनंतर सोमवारी रात्री तुरा शहरात रात्रीचा कर्फ्यू लागू केला. सध्या जिल्हा प्रशासन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत आहे. ते म्हणाले की, परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तुरा नगरपालिका क्षेत्रातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दुकाने उघडी असून रस्त्यांवर वाहनांची ये-जा सुरू आहे.
हेही वाचा :