हैदराबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात २३ मार्च हा दिन काळा दिवस म्हणून गणला जातो. या दिवशी भारत मातेच्या तीन वीर सुपूत्रांना ब्रिटीश सरकारने फासावर लटकावले होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव असे भारत मातेच्या बलिदानी वीर सुपूत्रांची नावे आहेत. या वीर सुपूत्रांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपले सर्वोच्च बलिदान केले. त्यांच्या बलिदानाचा दिवस भारतात शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल क्रांतिकारक : भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांचा जहाल इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात जहाल क्रांतिकारक म्हणून भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांची नावे ्ग्रक्रमाने घेतली जातात. या क्रांतिकारकांमधील भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही इंग्रजी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली होती. या थोर क्रांतीकारकांच्या धसक्याने इंग्रज अधिकाऱ्यांची झोपमोड केली होती. त्यामुळे या तिघांनाही इंग्रज अधिकाऱ्यांनी एकाच वेळी शिक्षा करुन भारतीय स्वातंत्र्य लढा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांच्या बलिदानामुळे भारतीय तरुण आणखीणच चवताळून उठल्याचे पुढे आले.
भगतसिंह : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जहाल क्रांतिकारक म्हणून भगतसिंह यांचे नाव अजरामर आहे. भगतसिंह यांचा जन्म लायलपूर जिल्ह्यातील बिंगा या गावात २८ सप्टेंबर १९०७ ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशनसिंह तर आईचे नाव विद्यावती कौर होते. १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने भगतसिंह यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. भारतीय नागरिकांवर होत असलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांचा अत्याचार मोडीत काढण्यासाठी भगतसिंह यांनी अमृतसर येथील नॅशनल महाविद्यालयात सुरू असलेले आपले शिक्षण सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या आंदोलनानंतरही इंग्रजांनी चौरीचौरा येथे हत्याकांड घडवून आणले. त्यामुळे इंग्रजी अधिकाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भगतसिंह यांनी खुला विद्रोह केला. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी लाहोरमध्ये ब्रनी सँडर्सचा खून केला. त्यानंतर दिल्लीच्या संसदेवर बॉम्बहल्ला करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले.
शिवराम राजगुरू : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राजगुरू यांचे अमुल्य योगदान आहे. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांची मैत्री भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुपरिचित आहे. राजगुरू यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते. पुण्यातील खेड या गावाचे ते सुपूत्र होते. मात्र भारतीय स्वातंत्र्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे या गावाचे नाव राजगुरूनगर असे करण्यात आले आहे. राजगुरू हे महाराष्ट्रातील असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे पुरस्कर्ते होते. इंग्रजी अधिकाऱ्यांना गनिमी काव्याने त्यांनी जेरीस आणले होते. त्यामुळेच त्यांना भारतीय स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ के छद्म नावाने ओळखत होते. त्यांना कसरत करण्याची भारी हौस होती. संस्कृत शिकण्यासाठी वाराणसीला गेलेल्या राजगुरू यांची ओळख भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारकांशी झाली. चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराने प्रभावित झालेले राजगुरू यांनी हिंदुस्तान सोशॅलिस्ट आर्मीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांची भगतसिंह चंद्रशेखर आझाद, सुखदेव यांच्याशी मैत्री जमली. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी सँडर्सचा बदला घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संसदेवरही हल्ला केला. त्यामुळे इंग्रज सरकारच्या पायाखालची जमीन हादरली होती.
सुखदेव : सुखदेव यांचा जन्म पंजाबमधील लुधियानात १५ मे १९०७ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल थापर आणि आईचे नाव रल्ली देवी असे होते. भगतसिंह आणि सुखदेव हे दोघेही एकाच वर्षी जन्मले होते. दोघांचेही स्वातंत्र्य भारताचे स्वप्न सारखेच होते. त्यामुळे दोघांनीही एकाच वेळी शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. सुखदेव यांनी भगतसिंहला सँडर्सचा खून कसा करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले होते. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनी लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घेत सँडर्सला गोळ्या घातल्या होत्या. महात्मा गांधी आणि इर्विन करार करण्यात आला. त्यानंतर सुखदेव यांनी महात्मा गांधी यांना इंग्रजीतून पत्र लिहले. त्यांच्या या पत्रातून महात्मा गांधी यांना काही खळबळजनक प्रश्न केले होते. त्यामुळेच भगतसिंह, सुधेव, राजगुरू या क्रांतिकारकांना नियोजित वेळेआधिच २३ मार्च १९३१ ला सायंकाळी ७ वाजता फासावर लटकावले. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी या तिघाही क्रांतिकारकांनी मेरा रंग दे बसंती चोला म्हणत आपले बलिदान दिले. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीस ईटीव्ही भारतचे अभिवादन.
हेही वाचा - Savitribai Phule Death Anniversary : यंदा सावित्रीबाई फुले यांची 126 वी पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य