पणजी- देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा चालविण्याची जबाबदारी त्यांचे पुत्र उत्पल यांच्यावर भाजपने सोपविली आहे. नुकतेच निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांच्याशी निवडणूक लढविण्याविषयी चर्चा केली होती. उत्पल यांच्याकडे पणजी मतदारसंघाची जबाबदारी येणार असल्याने भाजप आमदार बाबुश मोन्सरात हे नाराज झाले आहेत.
मनोहर पर्रीकर यांचा राज्यातील पुढील वारसदार कोण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. पर्रिकरांच्या निधनानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे डॉ. प्रमोद सावंत हेच त्यांचे राजकीय वारसदार समजले जात आहेत. मात्र, पर्रिकरांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ही राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. मात्र पक्षाने त्याची मुळीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे उत्पल हे मागील काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त होते.
हेही वाचा-पंजाबमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, विदेशी पिस्तुलसह मोठा शस्त्रसाठा जप्त
मनोहर पर्रिकरांचा सांभाळणार वारसा
अनेक वर्षांपासून मनोहर पर्रीकर हे राजधानी पणजी मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. आमदार, विरोधी पक्षनेते ते राज्यात भाजपचे पाहिले मुख्यमंत्री असा त्यांचा याच मतदारसंघातून प्रवास झाला. याच मतदारसंघात त्यांना मानणारा आणि अर्थातच त्यांना मनोहर भाई ही उपाधीही देणारा मतदार आहे. मनोहर पर्रिकरांमुळेच वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत पर्रीकर यांच्या नावाचा उपयोग न करता निवडणूक लढविण्याचे आदेश पक्षाने उत्पल पर्रीकर यांना दिले आहेत.
हेही वाचा-हरियाणात शाळेचे छत कोसळले; 25 विद्यार्थी गंभीर जखमी
मोन्सरात हे पर्रीकर यांचे स्पर्धक
पणजीचे भाजप आमदार बाबुश मोन्सरात यांचे राजकीय आयुष्य नेहमीच विविध आरोपांनी गाजलेले आहे. तरुणीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोपही होता. पर्रीकर यांच्यासमोर मोन्सरात यांची राजकीय कारकीर्द कधीच उभारी घेऊ शकली नाही. पहिल्यांदाच पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यावर 2017 साली त्यांचे निकटवर्तीय सिद्धार्थ कुंकलीकर या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयीही झाले होते. पर्रीकर हे केंद्रातून राज्यात परतले. तेव्हा पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने आपला गड राखला होती. त्यावेळी त्यांच्यासमोर मोन्सरात हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.
हेही वाचा-उरी: रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; पाच एके-47, 70 हँड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त
25 वर्षांनंतर भाजपचा गड कोसळला
25 वर्षाहून अधिक काळ भाजप आणि पर्यायाने पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मार्च २2019 ला पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणुक झाली. प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत तत्कालिन काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सरात यांनी भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकलीकर यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. अखेर पहिल्यांदाच 25 वर्षे अबाधित असलेला भाजपचा गड काँग्रेसने जिंकला.