नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधला. कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना '26 जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण देश दु:खी झाला,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या वर्षातील पहिल्या 'मन की बात' कार्यक्रमास संबोधित करताना पंतप्रधानांनी 26 जानेवारीला शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराविषयी टिप्पणी केली. कृषी कायद्यांचा निषेध करणार्या शेतकऱ्यांनी पूर्वनियोजित मार्गाचा अवलंब केला नाही आणि दिल्लीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स तोडले. त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली आणि मालमत्तेची तोडफोड केली गेली. त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि त्याचे झेंडे त्याच्या तटबंदीवरून फडकावले. या पार्श्वभूमीवर 'तिरंग्याचा अपमान पाहून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्रातील नेत्यांची 'राम' भक्ती.. हिंदुत्वासाठी सर्वपक्षीयांची अयोध्या वारी
भारतात जगातील सर्वांत वेगवान कोरोना लसीकरण, औषधनिर्माणातील देशाची प्रगती
मागील वर्षी कोविड 19 च्या मोठ्या संकटाचा आणि आव्हानाचा सामना करावा लागला. यातून देश सावरत आहे. या लढाईला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षीही सर्वांनी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. देशाला आणखी वेगाने पुढे न्यायचे आहे. देशाच्या कोरोनाविरोधातील लढाईने जगात एक चांगले उदाहरण निर्माण केले आहे. तसेच, देशातील लसीकरण कार्यक्रमही जगासाठी चांगले उदाहरण ठरत आहे. भारतात देशातील सर्वांत मोठी कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या भारतातील लसीकरण जगात सर्वाधिक गतीने सुरू आहे, ही बाबही अभिमानास्पद आहे. केवळ 15 दिवसांत भारतात 30 लाख कोरोना योद्ध्यांचे लसीकरण झाले आहे. अमेरिकेसारख्या समृद्ध देशाला याच कामासाठी 18 दिवस लागले. तर, ब्रिटनला तब्बल 36 दिवस लागले. भारतात तयार झालेली कोरोना लस भारतासाठी अभिमानाचे प्रतीक बनली आहे.
जगभरातील अनेक देशांना भारताने या कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदत केली आहे. अनेक देशांना लस पुरवली आहे. यासाठी जगभरातून भारताचे आभार मानले जात आहेत. यामुळे जगभरातील देशांमध्ये भारताविषयीचा आदर वाढला आहे. भारताने औषधनिर्माणात प्रगती केली आहे.
पद्म पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्याचे आणि या विजेत्यांच्या कार्याची माहिती घेण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले. तसेच, या विजेत्यांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी घरात चर्चा करा, घरातील सदस्यांनी यावर ऊहोपोह करा, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. यातून घरात सर्वांनाच प्रेरणा मिळेल, नवीन सकारात्मक कार्ये करण्याची ऊर्जा मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.
पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन, रस्तेसुरक्षा, स्वच्छता आणि स्वालंबन
घनकचरा आणि घरगुती सांडपाण्याच्या पुनर्वापरावर आणि पर्यावरण संरक्षणावरही पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. तसेच, कचऱ्याच्या नावीन्यपूर्ण वापरातून पर्यावरणसंरक्षणासह धन उभे करण्याचा मार्ग मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कागदनिर्मिती आणि पर्यावरणसंरक्षण याचा मेळ साधणाऱ्या कलेविषयीही माहिती त्यांनी माहिती दिली. रस्तेसुरक्षा, स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. अनेक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांचे आणि प्रयोगांचेही कौतुक केले.
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त 'इंडिया सेव्हन्टी फाईव्ह' उपक्रम
तरुण लेखकांसाठी 'इंडिया सेव्हन्टी फाईव्ह' हे व्यासपीठ देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खुले केले जात आहे. याअंतर्गत देशातील स्वातंत्र्यसेनांनींविषयी लिहिण्यासाठी युवकांना प्रोत्साहित केले जाईल. यातून त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल आणि देशात अशा विषयांवर लिहिणाऱ्या लेखकांची फळी तयार होईल, ज्यांचा भारतीय वारसा आणि संस्कृतीविषयी अभ्यास असेल. याच्यामुळे भविष्याची दिशा निर्धारित करणारा 'थॉट लीडर्स'चा एक वर्ग तयार होईल. मी युवकांना यामध्ये भाग घेऊन आपल्या साहित्यिक कौशल्याचा वापर करण्याचे आवाहन करतो. शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर या उपक्रमाची माहिती मिळेल.
हेही वाचा - भारत सरकारने श्रीमंतांच्या संपत्तीवर कर आकारावे; अर्थतज्ज्ञांचे मत