नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगेचच हा राजीनामा मंजूर केला आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात सीबीआयने रविवारी रात्री उशिरा सिसोदिया यांना 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. मे 2022 मध्ये आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून जैन हे तिहार तुरुंगात आहेत. तर, सिसोदिया हे सीबीआयच्या ताब्यात आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात धाव - नवीन अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले होते. एकीकडे सीबीआयने मंगळवारी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे तर दुसरीकडे मनीष सिसोदिया यांच्या बाजूने अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचिकेसंदर्भात अपील : सिसोदिया यांच्या अर्जावर सुनावणी करताना, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले की, तुमच्याकडे इतर पर्यायही आहेत, जे सीआरपीसी 482 अंतर्गत उपलब्ध आहेत. आपण त्या पर्यायांवर का जाऊ इच्छित नाही? सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर, सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, विनोद दुआच्या प्रकरणातही अशाच प्रकारच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. आज किंवा उद्या दिवसअखेर या याचिकेला सुचीबद्ध करण्याची अपील केली आहे.
सिसोदिया अटकेत : मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने गुन्हेगारी कट, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 7 आणि पुरावे खोडून काढल्याबद्दल आणि दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे. या आधी सीबीआयने त्यांना तीन नोटिसा बजावल्या होत्या आणि चौकशीसाठी त्यांना कार्यालयात बोलावले होते. तिथे त्यांची 8 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. या शिवाय सिसोदिया यांच्या घर आणि कार्यालयात छापे टाकून कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली होती. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काय आहे प्रकरण? : दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या तक्रारीवरून सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मनीष सिसोदियासह एकूण 15 जणांची नावे आहेत. या सोबतच अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तर सीबीआयने या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. दोन्ही यंत्रणांनी आपापली प्राथमिक आरोपपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. जनसंपर्क कंपनी चालवणारे विजय नायर, समीर महेंद्रू, अभिषेक बोईनापल्ली, विनय बाबू, शरथ रेड्डी आणि अमित अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय राजेश जोशी आणि श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा राघव मागुंटा याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
हेही वाचा : Manish Sisodia to CBI Remand : मनीष सिसोदियांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी; दिल्लीतील राजकीय वातावरण तापले