इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. आता तर आंदोलकांनी क्रुरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आंदोलकांनी पिता-पुत्रासह तीन जणांची हत्या केली. या तिघांना झोपेत गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. यानंतर त्यांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. मृतक मैतेई समुदायाचे होते.
कुकी समाजाची अनेक घरे जाळली : हे तिघेही रिलीफ कॅम्पमध्ये राहत होते. मात्र परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर ते शुक्रवारी क्वाक्ता येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर क्वाक्ता येथे लगेचच संतप्त जमाव जमला होता. परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या जमावाला नियंत्रणात आणले. या घटनेनंतर बिष्णुपूर जिल्ह्यात कुकी समाजाची अनेक घरेही जाळण्यात आली.
एक कमांडो जखमी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता भागात कुकी समुदाय आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबारही झाला. गोळीबारात मणिपूरच्या एका कमांडोच्या डोक्याला दुखापत झाली. कमांडोला बिष्णुपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचाराच्या या ताज्या घटनांनंतर बिष्णुपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा दलाने सात बंकर नष्ट केले : मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोक बफर झोन ओलांडून मैतेई भागात आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. केंद्रीय सैन्याने बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता क्षेत्राच्या 2 किमी पुढे एक संरक्षित बफर झोन तयार केला आहे. आता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. वृत्तानुसार, फुगाचाओ आणि क्वाक्ताजवळ राज्य दल आणि आंदोलकांमध्ये जोरदार गोळीबार झाला. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, संयुक्त सुरक्षा दलाने कौत्रुक हिल रेंजमध्ये ऑपरेशन केले आणि सात बेकायदेशीर बंकर नष्ट केले.
इंफाळ खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत : शनिवारी मणिपूरमधील 27 विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या 24 तासांच्या संपामुळे इंफाळ खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास सर्वच भागात बाजारपेठा आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. दोन दिवसांपूर्वी बिष्णुपूर जिल्ह्यात सशस्त्र दल आणि मैतेई समुदायाच्या आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जण जखमी झाले होते.
हेही वाचा :
- Manipur Violence : मणिपूर घटनेवरून सर्वोच्च न्यायालय संतप्त, 'तीन महिने झाले..वेळ निघून चालली..',
- Manipur Violence : मणिपूरच्या राज्यपालांची मदत छावण्यांना भेट, 'त्या' दोन महिलांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
- Manipur Violence : 'मन की बात' नको, 'मणिपूर की बात' करा; 11 वर्षीय मुलीची पंतप्रधान मोदींना साद