इंफाळ (मणिपूर) : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अशांतता आहे. सरकारकडून अनेक वेळा जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न झाले असले तरी परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. आता राज्यात ताज्या हिंसाचाराचे वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मणिपूरच्या बिष्णुपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे.
कुकी अतिरेक्यांनी केली विद्यार्थ्याची हत्या : मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता येथे कुकी अतिरेक्यांनी एका विद्यार्थ्यासह तीन जणांची हत्या केली. मणिपूर पोलिस आणि संशयित कुकी अतिरेकी यांच्यात आज दुपारी बिष्णुपूर जिल्ह्यातील फौगकसाओ इखाई आणि लगतच्या क्वाक्ता भागात जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात एका विद्यार्थ्यासह किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रिलीफ कॅम्पमधील मुलाची गोळ्या झाडून हत्या : मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये, 19 वर्षीय मायेंगबम रिकी मेईतेई हा मोइरांग उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वीचा विद्यार्थी होता, जो क्वाक्ता येथील मोइरांग तुरेल मापल परिसरातील रहिवासी होता. रिकी, त्याची आई राहत असलेल्या रिलीफ कॅम्पमध्ये दुचाकीवरून जात असताना कुकी अतिरेक्यांनी क्वाक्ता सेरीकल्चर कॉम्प्लेक्ससमोर त्याला ठार मारले. वृत्तानुसार, विद्यार्थ्याला गोळ्या लागून अनेक जखमा झाल्या होत्या.
विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन : या घटनेनंतर मोईरांग उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी 19 वर्षीय मायेंगबाम रिकीच्या हत्येचा निषेध करत शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. निषेधादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी रिकीच्या हत्येचा तीव्र निषेध केला आणि क्वाक्टाच्या रस्त्यावर 'आम्हाला शांतता हवी, युद्ध नको' अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे, कुकी बंडखोर आणि कुकी लोकांचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, कुकी अतिरेकी आणि कुकी लोक चुराचंदपूर परिसरात प्रतीक म्हणून मृतांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते एक पोस्टर धरलेले दिसत आहेत, ज्यावर 'आम्ही आमचा जीव देण्यास तयार आहोत', असे लिहिले आहे.
अतिरिक्त जवान तैनात : या भागातील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आले आहे. मणिपूर पोलिसांव्यतिरिक्त सुमारे 40,000 केंद्रीय सुरक्षा कर्मचारी हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी आणि राज्यात सामान्य स्थिती आणण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराता आत्तापर्यंत 120 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हेही वाचा :