लखनऊ - 'तो मी नव्हेच' नाटकातील स्त्रीयांशी खोटे बोलून त्यांच्याशी लग्न करणारा लखोबा लोंखडे नावाचे पात्र सर्वांनाच माहिती आहे. अनेकींच्या जीवनाचा खेळखंडोबा करणारा अशाच एका लखोबा लोखंडेला उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटक केली आहे. खोटे नाव वापरून तीन लग्न करणाऱ्या मोहम्मद आबिद उर्फ आदित्य सिंगला लखनऊमध्ये अटक करण्यात आली.
आबिदची दुसरी पत्नी असलेल्या महिलेने इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 2016 मध्ये आरोपीने तिच्याशी खोटे नाव आणि खोटी व्यावसायिक माहिती देऊन लग्न केले होते. महिलेले दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आतापर्यंत तीन लग्ने केले असून त्याला सात मुले आहेत.
इंदिरानगर सेक्टर-9 मधील रहिवासी असलेल्या महिलेने अशी माहिती दिली की, आरोपीने आतापर्यंत बर्याच मुलींची फसवणूक आहे. आमची भेट 2015 मध्ये झाली होती. तेव्हा त्याने गुन्हे शाखेत 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' असल्याचे सांगितले होते. तो भाडेकरू म्हणून राहायला आला होता. याचदरम्यान त्याने खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ शूट केले आणि लग्न न केल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच मला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले. मात्र, मी नकार दिल्यानंतर त्याने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे महिलेने पोलिसांनी सांगितले.
तक्रारीनुसार, आरोपी सातत्याने अत्याचार करत होता आणि तिच्याकडील 16 लाख रुपये घेऊन गेला होता. पोलीस निरीक्षक अजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये त्याने झांसी येथे दुसर्या महिलेशी लग्न केले आहे.