कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. नव्या कृषी कायद्यांना रद्द केले नाही. तर तृणमूल काँग्रेस देशव्यापी आंदोलन करेल, असा इशारा ममता यांनी केंद्राला दिला. ममता यांनी बीएसएनएल आणि एअर इंडिया विकण्यावरून मोदींना लक्ष्य केले. तसेच देशाची तिजोरी भाजपाची वैयक्तिक मालमत्ता होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
'शेतकरी, त्यांचे जीवन आणि त्यांच्या उदरनिर्वाहाबद्दल खूप काळजी वाटत आहे. भारत सरकारने शेतकरीविरोधी कायदा मागे घ्यावा. जर त्यांनी तातडीने तसे केले नाही, तर आम्ही राज्य आणि देशभर आंदोलन करू. सुरुवातीपासूनच आम्ही या शेतकरीविरोधी कायद्यास विरोध करीत आहोत, असे टि्वट ममता यांनी केले आहे. शुक्रवारी, 4 डिसेंबरला अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा करु, असेही त्यांनी म्हटलं.
भारत सरकार प्रत्येक गोष्ट विकत आहे. रेल्वे, बीएसएनएल, एअर इंडिया, कोयला, बीएचआएल आणि बँकांना सरकार विकू शकत नाही. चुकीच्या हेतूने घेतलेले निर्गुंतवणुकीचे आणि खासगीकरणाचे धोरण सरकारने परत घ्यावे. आम्ही देशाची तिजोरी भाजपाची वैयक्तिक मालमत्ता होऊ देणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आंदोलनाचा आज आठवा दिवस -
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसोबतच आता ओडिशा आणि मध्य प्रदेशचे शेतकरीही दिल्लीकडे कूच करत आहेत.
पुरस्कार वापसी -
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. त्यांच्यासोबत शिरोमणी अकाली दलाचे (डेमोक्रॅटिक) प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंग धिंदसा यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचा निषेध म्हणून पद्मभूषण पुरस्कार माघारी करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - जगातील सर्वात मोठ्या अक्षय्य ऊर्जा प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन