कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्यात तृणमूलचेच सरकार सत्तेत येणार असून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर आपले लक्ष दिल्लीतील सत्तेकडे असेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये गुजराती लोकांची सत्ता येऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
सभेला संबोधित करताना ममता यांनी स्व:ताचा 'रॉयल बंगाल टायगर' असा उल्लेख केला. बंगालमध्ये गुजराती शासन लागू देणार नाही. तसेच आपल्या दुखापतीचा उल्लेख करत, बंगाल एका पायाने तर दिल्ली दोन पायाने जिंकेल, असे त्या म्हणाल्या.
छत्तीसगढ नक्षली हल्ल्यावरून आज ममता यांनी केंद्र सरकारवर टीका केली. भाजपा देशात योग्य शासन करत नसून त्यांचे लक्ष फक्त बंगालमधील निवडणुकीकडे आहे. राज्यात प्रचारासाठी भाजपा इतर राज्यातील खासदारांना आणत आहे. कारण, इथे त्यांच्याकडे एकही योग्य उमेदवार नाही, असेही त्या म्हणाल्या.
मोदींच्या टीकेचा मला काहीच फरक पडत नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझाला 'दीदी...ओ...दीदी' असा उल्लेख करतात. मात्र, त्याचा मला काहीच फरक पडत नाही, असेही ममता म्हणाल्या. तसेच त्यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आठ टप्प्यात विभागल्यावरूनही केंद्रावर टीका केली. राज्यातील निवडणूक ही तीन किंवा चार टप्प्यात पार पडली असती. मात्र, भाजपाने मुद्दाम आठ टप्प्यात ती विभागली आहे, असे दीदी म्हणाल्या.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका