कोलकाता : विश्वभारती विद्यापीठात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या घराच्या जागेचा वाद सुरू आहे. या वादात आता ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. अमर्त्य सेन यांचे घर पाडल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी विश्वभारती विद्यापीठाला दिला आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जीनी अमर्त्य सेन यांच्या विश्वभारती विद्यापीठातील जमिनीची कागदपत्रे अमर्त्य सेन यांना दिली होती. यानंतरही अमर्त्य सेन यांच्या घराच्या जागेवरुन सुरू असलेला वाद संपला नाही.
विश्वभारती विद्यापीठाने बजावली नोटीस : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना विश्वभारती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी जागा सोडण्याची नोटीस बजावली होती. यानंतर बुद्धिजीवी नागरिकांनी अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या छळ करण्यात येत असल्याचा दावा केला. मात्र आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विश्वभारतीविरुद्धच्या लढ्यात थेट अमर्त्य सेन यांची बाजू घेतली आहे. अमर्त्य सेन यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न झाला, तर आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने आगीशी खेळू नये : विश्वभारती विद्यापीठ आणि अमर्त्य सेन यांच्यामध्ये जागेचा वाद सुरू आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र यावरुन केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. शांतीनिकेतनमधील जागेच्या वादाचा कट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. दिल्ली सरकार विविध मार्गांनी बंगालला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. 'बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली किंवा गुजरात नाही, जिथे जंगलराज सुरू आहे. भाजपशासित राज्यात बिल्किस बानोवर झालेल्या बलात्कारानंतर सगळेच दोषी कसे निर्दोष सुटले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा बंगाल आहे, बंगाल आपल्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ओळखला जातो. बंगाल शिक्षण, संस्कृतीसाठी ओळखले जाते. हीच माती आहे जिथे राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद यांसारखे विचारवंत जन्माला आले आहेत. त्यामुळे येथे आगीशी खेळणे नागरिक मान्य करणार नसल्याचेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Amit Shah Nagpur Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा नागपूर दौरा रद्द