नवी दिल्ली - अनेक नेत्यांची निष्ठा पणाला लागलेली असताना काही निष्ठावंतांची नावं आजही आदराने घेतली जातात. त्यामध्ये गेली पाच दशकांपासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असलेले नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे एक नाव आहे. (Mallikarjun Kharge resigns) खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा आज शनिवार (दि. १ ऑक्टोबर)रोजी राजीनामा दिला आहे. खर्गे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अथवा दिग्विजय सिंह यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. अशात पक्षाने नुकत्याच पारित केलेल्या 'एक नेता एक पद' प्रस्तावानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. (Mallikarjun Kharge) शुक्रवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदाच्या शर्यतीत खर्गे आघाडीवर आहेत. जी-२३ गटातील पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी तसेच भूपिंदर हुड्डा यांनी अध्यक्षपदासाठी खर्गे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे.
‘एक नेता, एक पद’ या सुत्रानूसार काँग्रेस अध्यक्ष बनण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतु, गहलोत समर्थकांच्या बंडानंतर गांधी परिवाराचे विश्वासू, दलित नेते खर्गे यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले. त्यांचे नाव समोर येताच दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.