कोलकाता Mahua on Hiranandani affidavit : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्राला दोन पानांच्या निवेदनात उत्तर दिलंय. यात त्यांना कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलाय. खासदार महुआ मोईत्रांनी हिरानंदानी यांनी संसदेच्या आचार समितीला कथितपणे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित करत ते अधिकृत लेटरहेडवर किंवा नोटरीकृत नसल्याचा दावा केलाय.
पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित : महुआने X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कुणीतरी डोक्याला बंदूक लावल्याशिवाय भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती कोऱ्या कागदावर स्वाक्षरी का करेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच दर्शन हिरानंदानी यांना अद्याप सीबीआय किंवा प्रत्यक्षात कोणत्याही तपास यंत्रणेने समन्स बजावलेले नाही. मग त्यांनी हे प्रतिज्ञापत्र कोणाला दिलंय? असा प्रश्नही त्यांनी पोस्टमध्ये विचारलाय.
हिरानंदानी यांना पत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा दावा : व्यापारी हिरानंदानी यांना पत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा दावा करत मोईत्रा म्हणाल्या , पीएमओनं दर्शन आणि त्यांच्या वडिलांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन आणि त्यांना पाठवलेल्या या पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला. त्यांचे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची धमकी देण्यात आली. सीबीआय छापे टाकेल आणि सर्व सरकारी कामं बंद होतील, बँकांशी त्यांचे व्यवहार बंद होतील, असं त्यांना सांगण्यात आलं. या पत्राचा मसुदा पीएमओनं पाठवून त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र ते लगेचच प्रेसमध्ये लीक झालं. हे या भाजपा सरकारचं किंवा भाजपानं चालवलेल्या गौतम अदानी सरकारचं सामान्य कामकाज आहे. माझी बदनामी करण्याचा आणि माझ्या जवळच्या लोकांना एकाकी पाडण्याचा आणि धमकावण्याचा प्रत्येक प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
हेही वाचा :