हैदराबाद - महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज 61 वर्ष पूर्ण होत आहेत. पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून देशात आपले राज्य अग्रेसर आहे. या मातीती घडलेल्या समाजसेवक, विचारवंत, खेळाडू, कलाकार आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाने 'महाराष्ट्र देशाचे' नाव जगात पोहोचवले आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या तेलंगणातील एका मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या वैद्यकीय सेवेचा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा...
डॉ. पाटील पंढरीचे रहिवासी-
सोलापूर जिल्ह्याला डॉ. द्वारकानाथ कोटणीस यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा वारसा लाभला आहे. तसाच वारसा कोरोना योद्धे म्हणून ओळखले जाणारे मराठमोळे पोलीस अधिकारी डॉक्टर संग्रामसिंह पाटील पुढे चालवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे सुपुत्र असलेले डॉ. संग्रामसिंह पाटील हे सध्या तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडे भूपलपल्ली जिल्ह्याची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे.
घरच्या परंपरेवेगळी वाट-
2011 मध्ये पाटील यांनी त्यांची एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. त्यांच्या घरातील डॉक्टर होणाऱ्यापैकी संग्रामसिंह पाटील हे तिसऱ्या पिढीतील डॉक्टर आहेत. त्यांच्या घरात एकूण 16 डॉक्टर आहेत. त्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळाल्यावर दिल्लीत जवळपास दीडएक वर्ष रुग्णसेवा केली. पुढे त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी घरच्या परंपरेला फाटा देऊन सिव्हिल सर्विसमध्ये यायचा निर्णय घेतला आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर डॉक्टर पाटील यांनी यूपीएससी परीक्षेतही यश मिळवले आणि ते पुढे भारतीय पोलीस सर्व्हिसमध्ये तेलंगणा राज्यात पोलीस अधीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले.
तेलंगणामधील आदिवासी बहुल मुलुगु जिल्ह्यात पोस्टिंग झाल्यावर डॉक्टर पाटील यांनी, परिसराचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्यातल्या डॉक्टरला आपसूकच लक्षात आले की, कायदा व सुव्यवस्थेसोबत येथील नागरिकांना आरोग्यसुविधा पुरवणं गरजेचे आहे. 2019 पासून डॉक्टर संग्रामसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास 100 आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या, आणि तेथील 5 हजार पेक्षा जास्त गोट्टी कोया या आदिवासी जमातीतील नागरिकांना वैद्यकीय मदत पुरवली.
या ठिकाणी आदिवासींच्या आरोग्याबाबत अनेक समस्या होत्या. त्यामध्ये पोषण आहाराची कमतरता, हिमोग्लोबिन, त्वचेचे आजार आणि इतर शारीरिक समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्यानंतर डॉक्टर पाटील यांच्या प्रयत्नातून जवळपास 7 लाख रुपयांची औषधे या आदिवासींच्या पाड्यामध्ये पोहोचली असतील.
जनहितासाठी खाकी वर्दीवर चढवला स्टेथोस्कोप
नियमित गस्त म्हणून पोलिसांना दुर्गम भागात जावे लागते, मात्र दळण वळणाच्या सुविधा नसल्याने काही वेळा चालत गस्त घालावी लागते, अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होणे दुर्लभच होते. त्यावेळी तिथल्या नागरिकांशी संवाद होत असे, तेव्हा त्यांची आरोग्यविषयक परिस्थिती पाहून कुटुंबातील डॉक्टरकीचा वारसा लाभलेल्या पाटील यांना त्यांचे दुःख आणि वेदना समजायला वेळ लागला नाही. त्यावेळी पोलीस अधीक्षक पाटील यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करण्याचे ठरवले आणि जनहितासाठी खाकी वर्दीवर स्टेथोस्कोप चढवला.
पाटील यांनी लगेच नियोजन सुरू केले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच इंडियन मेडीकल असोसिएशनशी संपर्क साधून 20 डॉक्टरांचे एक पथक तयार केले. या पथकाने या दुर्गम भागात आरोग्य तपासणी आणि उपचार करण्याची मोहीम हाती घेतली. जवळपास 100 आदिवासी पाड्यातून त्यांनी आरोग्य शिबिरे सुरू केली. पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांचे हे पथक वाड्या वस्तीवर जाऊन तिथल्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेत असत, आजाराचे निदान झाले की तिथेच गोळ्या औषधे देण्यात येऊ लागली. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतल्या आणि त्याला यशही मिळत आहे.
कोरोना काळात पोलिसांच्या आरोग्यासाठी ‘रचकोंडा पॅटर्न’-
पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यातील पोलीस दलाचा कार्यभार आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी तितक्याच बारकाईने घेण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे, यासाठी त्यांनी रचकोंडा पॅटर्न अंमलात आणला.
काय आहे रचकोंडा पॅटर्न
मुळचे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या आणि रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी कोरोना काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी , कोरोना टेस्ट लसीकरण, कोरोना केअर सेंटर आणि उपचार केले जाते.
हीच पद्धत डॉक्टर संग्रामसिंह पाटील यांनी देखील राबवली आहे. पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला औषधांचे किट दिले जाते. दररोज त्यांच्या आरोग्याचा अहवाल मागवला जातो. या पद्धतीने मुलुगु आणि भूपलपल्ली या दोन्हीही जिल्ह्यात आतापर्यंत एकही पोलीस योद्धा कोरोनाचा बळी पडू दिला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.: