नवी दिल्ली - महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी रेमडेसिवीरचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले होते. तसेच, केंद्राने महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन देण्यास मनाई केल्याचा आरोपही केला जात आहे. यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हे आरोप फेटाळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या महाराष्ट्राला ऑक्सिजनचा 1 हजार 500 मेट्रिक टन पुरवठा करण्यात येत आहे. इतर राज्यांपेक्षा सर्वांत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला करण्यात येत असल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले.
राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणम, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात येणार आहे. राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना केंद्र सरकारने 12 राज्यांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी 12 राज्यांशी चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात 6177 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होईल, असे गोयल यांनी सांगितले.
सरकार खांद्याला खांदा लावून राज्यांसोबत काम करत आहे. केंद्र सरकारची वेगवेगळी मंत्रालये आणि विभाग दर दोन दिवसांत १२ राज्यांसह विस्तृत बैठक घेत आहेत. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यांच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे, असे गोयल यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी 18-19 तास काम करतात -
केंद्र सरकार ग्रीन कॉरिडोर तयार करुन राज्यांना ऑक्सिजन पुरवत आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकार रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18-19 तास काम करत आहेत, असे गोयल यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोना संकट :रेल्वे प्रशासन चालवणार ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’