पाटणा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या बंडामुळे उभी फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना या वयात बाहेर पडण्याची वेळ आली. मात्र शरद पवार हे दिग्गज नेते असून त्यांचे कोणी काहीच करू शकत नसल्याचा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये सत्तापालट होण्याच्या शक्यतेवर लालू प्रसाद यांनी सुशिल मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
कोण आहेत सुशील मोदी : बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या राजकारणावरही मोठी टीका केली आहे. बिहारमध्येही बदल होणार का असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी लालूप्रसाद यादव यांना विचारला होता. यावेळी सुशील मोदी यांनीही बिहारमध्ये बदल होण्याचे संकेत दिले असल्याचेही माध्यम प्रतिनिधींनी विचारले. यावेळी संतापलेल्या लालू प्रसाद यादव यांनी कोण आहेत सुशील मोदी असा सवाल केला. सुशील मोदी म्हणजे काय, असेही त्यांनी यावेळी विचारले.
बिहारमध्ये सत्ताबदलाची चर्चा : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर बिहारमध्ये अचानक राजकारण तापले आहे. भाजपचे सर्व बडे नेते बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथापालथ होणार असल्याची चर्चा करत आहेत. त्याचवेळी चिराग पासवान आणि कुशवाह हे नेते देखील जेडीयू तुटल्याची चर्चा करत आहेत. अशा स्थितीत लालू प्रसाद यादव यांचे हे वक्तव्य विरोधकांचे मनसुबे उधळून लावणारे आहेत.
काय आहे राष्ट्रवादीतील वाद : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले आहे. रविवारी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे दिग्गज आणि शरद पवार यांचे विश्वासू नेतेही अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा -